नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य इशारा पाहता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट व सुसज्ज करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.
शुक्रवारी बोरखेडी ग्रामपंचायत, बुटीबोरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील लसीकरण केंद्र, भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय व रिसर्च सेंटरला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार ॲड. अभिजित वंजारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, उपविभागीय अधिकारी इंदिरा पखाले उपस्थित होत्या.
भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय व रिसर्च सेंटरच्या परिसराची त्यांनी पाहणी केली. यावेळी येथे १०० बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्राचार्य डॉ. मोहन येण्डे यांनी महाविद्यालय व रिसर्च सेंटरच्या कामाची माहिती दिली, तसेच सौम्य लक्षणे असलेल्या व गृहविलगीकरणातील बाधितांसाठी आयुष मंत्रालयाच्या वतीने नि:शुल्क आयुष-६४ गोळ्यांच्या वितरणाची माहिती दिली.