नागपूर : श्रावणाच्या पहिल्या सोमवारी नागपूरवर मेघराजाची कृपा दिसून आली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. श्रावणाच्या पुढील चार दिवसात अर्थात २३ जुलैपर्यंत नागपुरात ढगाळ वातावरण राहील. दक्षिण पूर्व मध्य प्रदेश ते उत्तर पूर्व विदर्भात आकाशात कमी दाबाचे क्षेत्र व सायक्लोनिक सकुर्लेशन निर्माण झाले आहे. यामुळे विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार २२ जुलैपर्यंत आकाशात काळे ढग राहतील. या कालावधीत नागपुरात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर शहरात १ जून ते १८ जुलै दरम्यान ६३५.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सरासरीच्या तुलनेत ७८ टक्के अधिक आहे. जून अखेरपर्यंत सरासरीच्या तुलनेत २९ टक्के पाऊस कमी होता. तर जुलैच्या १८ दिवसात ५१५.६ मि.मी. पाऊस झाला. वास्तविक जुलै महिन्यात सरासरी ३१३ मि.मी. पाऊस पडतो.
विदर्भाचा विचार करता आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ५७ टक्के अधिक. पाऊस झाला आहे. विदर्भात आतापर्यंत ५४९.३ मि.मी. पाऊस झाला. तर सरासरी पाऊस ३४९.६ मि.मी. पडतो. एकूणच विचार करता नागपूरसह विदर्भात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.
दिवस व रात्रीच्या तापमानात २.९ अंशाचे अंतर
दिवसभर आकाशात काळे ढग होते. अधूनमधून पाऊस सुरू होता. यामुळे कमाल तापमान १.६ अंशावरून २६.९ अंशावर गेले. रात्रीच्या तापमानाही इतक्याच अंशाने घट नोंदविण्यात आली. कमाल तापमान २४ अंश सेल्सियस तर कमाल तापमानात २.९ अंश सेल्सियसचे अंतर नोंदविण्यात आले.
दीड दिवसात ७३.५ मि.मी. पाऊस
नागपुरात गेल्या दीड दिवसात ७३.५ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. सकाळी ८.३० वाजेपर्यंत ६३.५ मि.मी. व सांयकाळी ५.३० पर्यंत १०मि.मी. पावसाची नोंद झाली. नागपुरात रविवारी रात्री उशिरापर्यंत चांगला पाऊस झाला. सोमवारी अधूनमधून पावसाच्या सरी पडल्या. दुपारी पावसाचा जोर वाढला होता. सकाळी व सायंकाळी आर्द्रता ९८ टक्के नोंदविण्यात आली.