वसीम कुरेशी
नागपूर : ४४ क्रमांकाच्या नागपूर-वर्धा हायवे वरील बुटीबोरी चौकात असलेल्या पुलाचे काम २१ महिन्यावरून आता २६ महिन्यावर गेले आहे. तरीही ते अपूर्णच आहे. मात्र नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे (एनएचएआय) मार्च २०२१ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
या फ्लायओवरचे बांधकाम १ डिसेंबर २०१८ पासून सुरू झाले आहे. २१ महिन्यात म्हणजे ३१ ऑगस्ट २०२० पूर्वी त्याचे काम पूर्ण व्हायला हवे होते. या चार लेन पुलाची लांबी १.८ किलोमीटर आहे. ५१.१९३ कोटी रुपयांचा खर्च करून उभारल्या जात असलेल्या या फ्लायओवरमध्ये आता दोन्ही बाजुंनी रॅम्पचे डांबरीकरण आणि मधल्या अंडरपासच्या भागातील काँक्रिटीकरण बाकी आहे. बुटीबोरी चौकात सुरू असलेल्या या कामाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांसाठी सिंगल लेन सोडली आहे. मात्र प्रचंड वाहतुकीमुळे हा मार्ग लहान पडतो. वाहतूक नियंत्रणासाठी येथे दोन शिपाई नियुक्त असले तरी त्यांच्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण येतो. काही मिनिटांतच वाहने थांबवून मार्ग खुला करावा लागतो. यामुळे येथे वारंवार जाम लागतो. चौकालगत असलेल्या वस्तीमध्ये जाण्यासाठी रस्ता असला तरी या परिसरात असलेला मॉल, दुकाने, हॉटेल्स यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. बुटीबोरी औद्याेगिक वसाहतीमध्ये जाणारी वाहनांची संख्याही अधिक आहे. तेथील कर्मचाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. यामुळे सर्वांना जामचा सामना करावा लागतो.
...
पायी चालण्यासाठी जागाच नाही
पुलाच्या दोन्ही बाजूला कॉंक्रिटच्या नाल्या तयार केल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी येथे जळाऊ लाकडे ठेवली आहेत. काही दुकानदारांनी आपले बोर्ड उभारले आहेत. अतिक्रमणामुळे पायी चालणाऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे.
...