आनंद डेकाटे/कमल शर्मा
नागपूर : नागपूर-मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम नागपूर जिल्ह्यात पूर्ण झाले आहे. लोकार्पणाच्यापूर्वीच वाहनेही धावू लागली आहेत. दरम्यान, लोकार्पणाची तयारीही सुरू झाली आहे. परंतु समृद्धी महामार्ग जेथून सुरू होतो, त्या शिवमडका येथील एन्ट्री पॉईंटपर्यंत पोहोचणे मात्र कठीण काम आहे. ती समस्या लवकर संपण्याची शक्यताही नाही. कारण शिवमडकापर्यंत पोहोचण्याचा रस्ता पूर्ण व्हायला अजून १८ महिने लागण्याची शक्यता आहे.
शिवमडकासाठी वर्धा रोडसह हिंगणा रोडकडून आऊटर रिंगरोडच्या माध्यमातून पाेहोचता येते. ‘लोकमत’चा चमू जेव्हा समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी या रस्त्यावर पोहोचला तेव्हा हा रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत दिसून आला. वर्धा रोडवरून किमान ३ किमीचा रस्ताच व्यवस्थित आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनंतर तर रस्ताच नाही. कुठे-कुठे काम सुरू आहे. जेसीबीपासून अनेक रोडरोलर रस्त्यावर काम करीत आहेत. पूर्ण रस्त्यावर मातीचे ढीग पसरले आहेत. दुसरीकडे हिंगणा रोडकडून येणारा रस्तासुद्धा फारसा चांगला नाही. जागोजागी खड्डे आहेत. आऊटर रिंगरोडचे काम करीत असलेल्या एनएचएआयच्या सूत्रानुसार आऊटर रिंग रोडअंतर्गत या रस्त्याचे काम ज्या कंपनीकडे सोपवण्यात आले होते, ती कंपनी वेळेत काम पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे तिची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली असून, नवीन कंपनीकडे काम सोपवण्यात आले आहे. या कंपनीने महिनाभरापूर्वीच काम सुरू केले आहे. काम पूर्ण व्हायला जवळपास १८ महिने आणखी लागतील. त्यामुळे साहजिकच समृद्धी महामार्गापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
एका महिन्यापूर्वीच सुरू झाले काम
एनएचएआयचे म्हणणे आहे की, या रस्त्याचे काम तांत्रिक कारणांमुळे थांबले होते. एका महिन्यापूर्वीच काम सुरू झाले आहे. कामाला गती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. परंतु हे काम कधी पूर्ण होईल, हे आताच सांगता येणार नाही.
बुटीबोरी एंट्री पॉईंटजवळची परिस्थितीही सारखीच
बुटीबोरी एंट्री पॉईंटजवळसुद्धा समृद्धीला जोडणाऱ्या रस्त्याची परिस्थिती सारखीच आहे. बुटीबोरीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. जवळपास ३०० मीटरच्या रस्त्यावर माची व गिट्टी टाकलेली आहे. येथे काम सुरू असल्यामुळे सातत्याने धूळ उडत असते.