नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल म्हणाले की याला राजकीय रूप देणे चुकीचे आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआयकडे तपास सोपविला आहे. त्यानुसार तपास यंत्रणा काम करीत आहे. त्यामागे कुठलेही राजकारण नाही.
नागपुरात पोहचल्यानंतर फडणवीसांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या कारवाईसंदर्भात फडणवीस यांना विचारणा केली असता ते म्हणाले ही कारवाई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होत आहे. तपास यंत्रणा आपले कर्तव्य करीत आहे. या कारवाई दरम्यान तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांच्या बाबतीत अधिक काही बोलण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. सीबीआय कारवाई करीत असताना, सीआरपीएफ तैनात राहते. हे प्रोटोकॉल अन्वये झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशात आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचे वक्तव्य केले आहे. यावर फडणवीस यांनी पुन्हा ही कारवाई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली आहे, कारवाई चुकीची असल्याचे म्हणणे योग्य नाही. ते म्हणाले आणीबाणीच्या काळात सुप्रिया सुळे यांचे वय फार कमी होते. त्यांनी ती परिस्थिती अनुभवली नाही. माझेही वय कमी होते, परंतु ती परिस्थिती मी अनुभवली आहे. माझे वडील कारागृहात होते. जॉर्ज फर्नांडिस सारख्या नेत्याला बर्फावर झोपविले होते. त्याविरुद्ध झालेल्या संघर्षानंतर देशात पुन्हा लोकशाही स्थापित झाली होती.
- संजय राऊत यांना राममंदिरावर बोलण्याचा अधिकार नाही
फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले राममंदिर या विषयावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. राममंदिरासाठी आम्ही संघर्ष केला आहे. मोदी यांच्या भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाने राममंदिरच्या बाबतीत निर्णय दिला आहे. अन्य लोकांचे यात कुठलेही योगदान नाही. आता राममंदिर बनत आहे. त्यामुळे काही लोकांचे पोट दुखत आहे.