नागपूर : इतिहाद एअरवेजने गुरुवारी दुपारी मिहान प्रकल्पाला भेट देऊन निवडक प्रकल्पाची पाहणी केली. कंपनी नागपुरातून कार्गो आणि प्रवासी विमान सेवा सुरू करण्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे सल्लागार (तांत्रिक) एस.व्ही. चहांदे यांनी मिहान प्रकल्पाचा आराखडा आणि अतुल ठाकरे यांनी पॉवर प्रेझेन्टेशनद्वारे प्रकल्पाची इत्थंभूत माहिती दिली. मिहान प्रकल्पाची माहिती देणारा लघुपट दाखविण्यात आला. इतिहाद एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पावर चर्चा केली. चमूने मिहान प्रकल्पात गुंतवणुकीची तयारी दर्शविली. इतिहाद एअरवेजच्या चमूमध्ये इंडियाचे उपाध्यक्ष नीरज भाटिया, कार्गो विभागाचे उपाध्यक्ष डेव्हिड करीर, नेटवर्क प्लॅनिंग विभागाचे उपाध्यक्ष अॅलेक्स फेदरस्टोन, एअरपोर्टचे महाव्यवस्थापक मॅथ्यू डेव्हिस, इंटरनॅशनल व पब्लिक अफेअरचे वरिष्ठ व्यवस्थापक मोक्ष वॅट्स यांचा समावेश होता. इतिहाद एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमंत्रणावरून मिहान प्रकल्पाला भेट दिली. यापूर्वी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. इतिहाद एअरवेजचा ग्लोबल कार्गो आणि प्रवासी नेटवर्कसाठी भारत हा महत्त्वाचा भाग आहे. प्रारंभी मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक अबधेश कुमार आणि महाव्यवस्थापक आबीद रूही यांनी मिहानच्या मध्यवर्ती सुविधा इमारतीत इतिहास एअरवेजच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य अभियंते एस.के. चॅटर्जी, उपजिल्हाधिकारी अशोक चौधरी, आणि जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इतिहाद एअरवेज सेवेसाठी तयार
By admin | Published: September 11, 2015 3:39 AM