नागपूर : केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरेटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)तर्फे प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीसाठी सरकारी प्रमाण म्हणून आधार कार्ड दिले आहे. आधार बनवून १० वर्षे पूर्ण झालेल्या, तसेच आधारमध्ये कुठलेही अपडेशन न केलेल्या व्यक्तीला आधारकार्ड अपडेट करायचे आहे. तसे निर्देश यूआयडीएआयने दिलेले आहे.
१० वर्षांनंतर आधार अपडेट करणे आवश्यक
१० वर्षांपूर्वी जे आधार कार्ड बनविण्यात आले, ते कुठल्या तरी दस्तऐवजाच्या आधारे बनविले होते. २०१६ मध्ये आधारसंदर्भात नव्याने पॉलिसी बनली. त्यात आधार बनविणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा व त्याच्या पत्त्याच्या पुरावा असेल तरच नवीन आधारकार्ड बनविले जाऊ लागले. त्यामुळे कुठल्या तरी दस्तऐवजावर आधार कार्ड बनविणाऱ्यांच्या आधार कार्डमध्ये तांत्रिक त्रुटी येत आहेत. त्यामुळे यूआयडीएआयने आधार काढून १० वर्षे पूर्ण झालेल्यांना अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत.
- १० वर्षांत आधार अपडेट केले असेल त्यांना गरजेचे नाही.
ज्यांनी १० वर्षांपूर्वी आधार काढले; पण काही कारणाने मोबाईल बदलला, पत्ता बदलला, बायोमॅट्रिक अपडेट केले, त्यांना अपडेट करण्याची गरज नाही.
आधार अपडेट कोठे कराल?
शहरातील आधार सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस व प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी आधार अपडेट करता येईल. त्यासाठी व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा व पत्त्याच्या पुरावा लागेल. माय आधार पोर्टलवरदेखील ऑनलाईन अपडेट करता येईल.
- पहिल्यांदाच आधार काढताय?
नवीन आधार कार्ड बनविण्यासंदर्भात केंद्राच्या गाइडलाइन आलेल्या आहे. त्यानुसार १८ वर्षांवरील व्यक्तीचे पहिल्यांदाच आधार कार्ड बनविण्यास निर्बंध घातले आहेत. १८ वर्षांवरील व्यक्तीचे नवीन आधार कार्ड बनविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आले.
- मुलांचे आधार अपडेट कधी कराल?
ज्या बालकांचे वय ५ ते ७ आहे किंवा ज्या युवकाचे वय १५ ते १७ आहे, त्यांना बायोमेट्रिक करावे लागणार आहे.
- आधार सेवेला १२ वर्षे झाली आहेत; पण ज्यांना आधार कार्ड काढून १० वर्षे झालीत, दरम्यान त्यांनी अपडेशन केले नाही, त्यांना ओळखीचे व पत्त्यांसंदर्भातील दस्तऐवज सादर करून अपडेट करून घ्यायचे आहे. सेवा केंद्रावर यासाठी ५० रुपये लागणार आहेत; तर ऑनलाईन स्वत:च्या मोबाईलवरून केल्यास त्यासाठी २५ रुपये लागणार आहेत.
- कॅप्टन अनिल मराठे
सेंट्रल मॅनेजर, आधार सेवा केंद्र, नागपूर