लोकमत विशेषकुमार संजय भुरे हा १८ वर्षाचा तरुण मुलगा लहानपणापासूनच थॅलेसिमियाने पीडित आहे. तो मूळचा कन्हानचा राहणारा आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तो नरखेडला आपल्या मावशीकडे शिकायला गेला. त्याला एक विजय नावाचा लहान भाऊ आहे. कुमार ८ वी ते १२ वी पर्यंत नरखेडलाच शिकला. परंतु त्याचा आजार पाहता घरच्यांनी त्याला पुढे शिकण्यास मनाई केली. मात्र कुमारला कुठल्याही परिस्थितीत शिकण्याची जिद्द होती. आपण शिकून आपल्या पायावर उभे व्हावे आणि आपल्या भावाचा सांभाळ करायचा या जिद्देने कुमार पेटला होता. कुमारचा आजार आणि त्याची शिकण्याची जिद्द पाहून लोकमतने पुढाकार घेत समाजाला आवाहन केले. कुमारवर विशेष वृत्त प्रकाशित केले. समाजातील अनेक लोक पुढे आले. मैत्री परिवार, हेडगेवार रक्तपेढी आणि थॅलेसिमिया सोसायटी आॅफ सेंट्रल इंडियाचे डॉ. विंकी रुघवानी हे पुढे आले. त्याच्या उपचाराचा, रक्त पुरवठ्याचा आणि शिकण्याचा प्रश्न मार्गी लागला. तो शिकला. आज तो कामठीतील भोयर फार्मसी कॉलेजमधून डी.फार्म. करीत आहे. भोयर कॉलेजमधील सुरेश भोयर आणि प्राचार्य मिलिंद उमेकर यांचीही त्याला चांगली साथ लाभली. कॉलेजच्या वसतिगृहात राहून तो शिकत आहे. समाजाने दिलेल्या मदतीमुळेच आपण आतापर्यंत जिवंत आहोत, याची त्याला जाणीव आहे. थॅलेसिमियासोबतच गेल्या तीन वर्षांपासून तो मधुमेहानेही पीडित आहे. अशा परिस्थितीत मदत करणाऱ्या लोकांमुळेच मी आतापर्यंत स्वस्थ असल्याचे कुमार आवर्जून सांगतो. त्याचा लहान भाऊ विजय हा सध्या चौथ्या वर्गात आहे. तो मावशीकडे शिकत आहे. लहान भावाची जबाबदारी सांभाळता यावी म्हणून कुमार शिकत आहे. आपल्या पायावर उभे राहून लहान भावाला मोठे करायची खूणगाठ त्याने बांधली आहे. आजारामुळे निराश होणारे समाजात अनेक आहेत. परंतु मृत्यूच्या दाढेत असूनही आपल्या आजारासोबत लढताना आपले भविष्य घडविण्यासाठी सुद्धा संघर्ष करीत असलेल्या कुमारने समाजासोमोर नवीन आदर्श घालून दिला असून थॅलेसिमिया आजाराच्या जनजागृती मोहिमेतील तोच खरा ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ ठरला आहे.
...तो थॅलेसिमियाला हरवतोय !
By admin | Published: May 08, 2015 2:06 AM