राम वाघमारे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. एकीकडे, सततच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना गाेधन पाळणे कठीण झाले आहे. दुसरीकडे सरकारच्या धाेरणांमुळे शेतात कष्टाची कामेे करायला मजूर मिळत नाही. अशा विपरित परिस्थतीत साेयाबीनची पेरणी केल्यानंतर, बियाणे व्यवस्थित झाकण्यासाठी शेतकऱ्याला भाड्याने बैलजाेडी मिळाली नाही. त्यामुळे त्याने झाडांच्या फांद्यांची फसाट ओढण्याचा निर्णय घेतला. ही फसाट ओढण्यासाठी मजूर न मिळाल्याने, नाईलाजास्तव शेतकरी दाम्पत्याने दिवसभर शेतात फासट ओढली. हा प्रकार नांद परिसरातील पांजरेपार (ता.भिवापूर) शिवारात साेमवारी अनुभवायला मिळाला.
मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस बरसत असल्याने, नांद (ता.भिवापूर) परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुकाराम केशव राऊत (४५) व संगीता तुकाराम राऊत (३२), रा.महालगाव, ता.भिवापूर या शेतकरी दाम्पत्यानेही साेयाबीन पेरणीचा निर्णय घेतला. त्यांची पांजरेपार शिवारात चार एकर वडिलाेपार्जित शेती आहे. त्यांच्याकडे बैलजाेडी हाेती. मात्र, संपत्तीच्या वाटणीत ती बैलजाेडी माेठ्या भावाच्या वाट्याला गेली असल्याचे तुकाराम राऊत यांनी सांगितले.
लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आपण उमरेड शहरातील किराणा दुकानात नाेकरी केली. याच वर्षी वडिलाेपार्जित संपत्तीची वाटणी झाल्याने आपण शेतावर परतण्याचा, तसेच शेतात साेयाबीनचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. पेरणीसाठी भाड्याने बैलजाेडी सांगितली. पेरणी करताच, साेयाबीनचे बियाणे व्यवस्थित झाकावे लागते. त्यामुळे फसाट ओढण्यासाठी दुसरी बैलजाेडी व मजूर मिळाले नाही. त्यामुळे आपण स्वत: फसाट ओढण्याचा निर्णय घेतला. फसाट जड असून, ती संपूर्ण शेतात एकट्याला ओढणे शक्य हाेत नाही, हे लक्षात येताच, पत्नी संगीता आपल्या मदतीला आली. आम्ही दाेघांनी दिवसभर ही फसाट ओढून शेतातील संपूर्ण बियाणे झाकल्याचेही तुकाराम राऊत यांनी सांगितले.
...
१,५०० रुपये भाडे
पेरणीसाठी बैलजाेडीला एका दिवसासाठी १,५०० रुपये भाडे द्यावे लागते. पेरणीसाठी लागणाऱ्या मजुरांच्या मजुरीचा खर्च वेगळा असताे. एक बैलजाेडी दिवसभरात चार ते साडेचार एकर शेताची पेरणी करते. ग्रामीण भागात आधीच गाेधन कमी झाल्याने, तसेच सर्व शेतकऱ्यांची पेरणी एकाच वेळी येत असल्याने, पेरणीसाठी व फसाट ओढण्यासाठी बैलजाेडी मिळत नाही. आपण शेतकरी असून, शेतात कष्टाची कामे करण्यास आपल्याला कसलीही लाज वाटत नाही, अशी प्रतिक्रिया तुकाराम व संगीता राऊत यांनी व्यक्त केली.
...
बियाणे झाकणे महत्त्वाचे
पेरणी करताना शेतात छाेट्या चऱ्या तयार हाेतात. त्यात बियाणे पडल्यानंतर पाऊस आला आणि चऱ्यांमध्ये पावसाचे पाणी काही वेळ साचून राहिल्यास साेयाबीनचे बियाणे उगवत नाही. त्यामुळे ते काळजीपूर्वक झाकावे लागते. त्यासाठी झाडांच्या फांद्यांची फसाट तयार करून, ती संपूर्ण शेतात फिरवली जाते. फसाटमुळे चाऱ्यांच्या काठावरील माती आत जाऊन त्या सपाट हाेत असल्याने, पाणी साचण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे शेतकरी फसाटद्वारे बियाणे झाकण्याला विशेष महत्त्व देतात.