लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १७ मार्चपासून राज्यातील नाट्यगृहे अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा निर्णय सांस्कृतिक कार्यक्रमांवर पोट भरणाऱ्या सर्वच यंत्रणेसाठी मारक ठरला. संसर्गाचा धोका मोठा असल्याने या निर्णयाला नाट्यनिर्माते, सांस्कृतिक कार्यक्रमांचे निर्माते, आयोजक व कलावंतांनी प्रतिसादही दिला. मात्र, एक एक करत सर्वच बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आणि व्यापारी-ग्राहक असे व्यवहारही सुरळीत सुरू झाले असताना सांस्कृतिक क्षेत्राला का वगळले जात आहे, असा सवाल उपस्थित करत सांस्कृतिक क्षेत्रातूनही आवाज उठविण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या चार महिन्यात टाळेबंदीमुळे संपूर्ण देशाचे आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले आहेत. ही स्थिती सुधारावी आणि संक्रमणाला थोपविण्याच्या योजनेनुसार देशभरात सरकारच्या दिशानिर्देशानुसार १ आॅगस्टपासून ‘अनलॉक ३’ची तयारी केली जात आहे. अशा परस्पर विसंगत धोरणामुळे सांस्कृतिक क्षेत्र हैराण झाले आहे. एकीकडे बाजारपेठांना काही मर्यादा घालत मोकळीक दिली गेली. मॉल्स, जिम, जलतरण तलाव, चित्रपट गृहांना ठराविक ग्राहक संख्येसह परवानगी देण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, इतर व्यावसायिकांप्रमाणेच नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियमित आयोजनावर निर्भर असलेल्या निर्माता, आयोजक व कलावंतांसंदर्भात अद्याप कोणतेही दिशानिर्देश जाहीर करण्यात आलेले नाही. गेल्या चार महिन्यांपासून आलेली बेरोजगारी, विस्कटलेले आर्थिक गणित या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक क्षेत्रातून नाट्यगृहे सुरू करण्यास व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठीच्या मागणीने जोर पकडण्यास सुरुवात केली आहे.एक तृतीयांश प्रेक्षक संख्येसह परवानगी द्यावीनागपुरात व्यावसायिक नाटकांचे वितरक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे निर्माते तसेच महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरक संस्थेचे उपाध्यक्ष समीर पंडित यांनी एक तृतीयांश प्रेक्षकसंख्येसह नाट्यगृहे सुरू करण्याची व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी पुढे केली आहे. या संदर्भात आम्ही सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.