योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व विद्यापीठ एकाच ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर यावी तसेच कामामध्ये एकवाक्यता व सुलभता यावी यासाठी ‘आययूएमएस’ (इंडिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रणाली लागू करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर दबाव येत आहे. ही प्रणाली लागू करताना विविध तांत्रिक आव्हाने तर आहेत, शिवाय महाविद्यालयांचे कामदेखील वाढणार आहे. प्रत्येक संलग्नित महाविद्यालयात अंतर्गत विशेष समिती स्थापन करावी लागणार असून त्यांच्यावरील कामाचे ओझे वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.प्रवेश, परीक्षा, निकाल इत्यादी संदर्भातील विविध समस्यांवर ‘एन्ड टू एन्ड’ तोडगा मिळावा यासाठी ‘आययूएमएस’ प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचा दावा राज्य शासनाने केला होता. मागील वर्षी यासंदर्भात शासननिर्णयदेखील जारी करण्यात आला होता व काही विद्यापीठांमध्ये यासंदर्भात प्रयोगदेखील सुरू झाला. नागपूर विद्यापीठात मागील आठवड्यात संबंधित प्रणाली राबविण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या लोकांनी सादरीकरणदेखील केले. मात्र ही प्रणाली राबविताना केवळ विद्यापीठच नव्हे तर महाविद्यालयांचे कामदेखील वाढणार आहे.‘आययूएमएस’साठी प्रत्येक महाविद्यालयांत ‘कोअर’ अंमलबजावणी समिती गठित करावी लागणार आहे. यात प्राचार्य किंवा उपप्राचार्य, प्रशासकीय सेलचा एक प्रतिनिधी, आयटी सेलचे दोन प्रतिनिधी, शिक्षक व विद्यार्थ्यांमधून प्रत्येकी दोन प्रतिनिधी राहणार आहेत. ‘आययूएमएस’ची अंमलबजावणी होईपर्यंत या समितीची दर आठवड्याला बैठक अनिवार्य आहे व तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवावा लागणार आहे. याशिवाय नियमितपणे प्रकल्पाची अंमलबजावणी, महाविद्यालयांतील विविध घटकांसमवेत नियमित बैठका, विद्यापीठासोबत समन्वय, प्रणाली राबविणाऱ्यांसमवेत संपर्क, महाविद्यालय व ‘महाआयटी’मधील समन्वय, इत्यादी जबाबदाऱ्या या समितीला पार पाडाव्यालागणार आहेत. नागपूर विद्यापीठातील अनेक संलग्नित महाविद्यालयांमध्ये आवश्यक प्रमाणात नियमित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी नाहीत. अ़नेक ठिकाणी तर ‘आयटी टीम’चा कारभार एकाच व्यक्तीच्या भरवशावर सुरू आहे. अशा स्थितीत नियमांनुसार बºयाच महाविद्यालयांत ‘कोअर’ अंमलबजावणी समितीच स्थापन करणे हे मोठे आव्हान राहणार आहे. शिवाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामदेखील वाढणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांकडून यासंदर्भात नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांना संपर्क केला असता सध्या केवळ चर्चा सुरू असून अद्याप ‘आययूएमएस’बाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी नामनिर्देशित कसे करणार ?‘कोअर’ अंमलबजावणी समितीमध्ये प्रत्येक महाविद्यालयात दोन विद्यार्थी असणे अनिवार्य आहे. परंतु या विद्यार्थ्यांचे समितीवर नामनिर्देशन करण्यासाठी त्यांची पात्रता काय हवी किंवा इतर काय आवश्यकता आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे यासंदर्भातदेखील नेमकी भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे मत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.