‘शिवकल्याण राजा’च्या संगीतमय सादरीकरणात पुरंदरेंनी उलगडला इतिहासनागपूर : शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रजेला निष्ठा शिकविली. या देशाला राष्ट्रीय चारित्र्य महाराजांनी दिले. त्यांनी गाजविलेल्या पराक्रमाचा, त्या इतिहासाचा अभिमान बाळगलाच पाहिजे, असे ठणकावतच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी आवाहन केले. या आवाहनातच ‘जय देव जय देव, जय जय शिवराया...’ ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली आरती गाऊन पं. हृदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर व विभावरी जोशी यांनी छत्रपतींचा पराक्रम वर्णन केला. निमित्त होते ‘शिवकल्याण राजा’च्या प्रस्तुतीकरणाचे.प. पू. सद््गुरूदास महाराज (विजयराव देशमुख) अमृत महोत्सव समिती, छत्रपती सेवा प्रतिष्ठान व श्री गुरूमंदिर परिवार यांच्यावतीने सोमवारी लक्ष्मीनगर मैदानावर शिवकल्याण राजाचे संगीतमय सादरीकरण करण्यात आले. हे आयोजन बाबासाहेब पुरंदरेंनी शिवचरित्र उलगडताना विविध विषयांवर केलेली फटकेबाजी अनोखी ठरली. पुरंदरे यांनी फ्रान्स येथील संग्रहालयाच्या भेटीचा उल्लेख करीत तेथील लोक पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या तुटलेल्या तलवारीचा अभिमान बाळगतात, मग आपल्या देशवासीयांनी शिवरायांच्या जाज्वल इतिहास का विसरावा, असा सवाल त्यांनी केला. केवळ जयजयकार करून चालणार नाही तर तो राष्ट्राभिमान जागृत करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गायक कलावंतांनी शिवरायांच्या जन्माचा क्षण वर्णन करणारे राम गणेश गडकरी यांचे ‘गुणी बाळ असा जागसी का रे वाया, नीज रे नीज शिवराया...’ हे गीत सादर केले. पुरंदरे यांनी शिवछत्रपतींच्या जीवनातील एकेक घटनाक्रम वर्णन करून इतिहास जागता ठेवण्याचे आवाहन केले. रायगड, प्रतापगड, पन्हाळगड, शिवनेरीच्या घटनांचे दाखले देत शिवरायांनी घर सांभाळणाऱ्या गृहिणीप्रमाणे स्वराज्य सांभाळल्याचे सांगितले. त्यासाठी तयार केलेले निष्ठावंत मावळे आजही निर्माण व्हावेत, असे आवाहनही त्यांनी केले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या साथीने राधा मंगेशकर, विभावरी जोशी यांनी ‘हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा..., वेढात मराठे वीर दौडले सात..., आनंदवन भुवनी..., राज्याभिषेक शिवरायांचा..., निश्चयाचा महामेरू...’ आदी स्फूर्तिदायक गीते सादर केली. त्यांना सिंथेसायजरवर विवेक परांजपे, केदार परांजपे तर तबला व ढोलकीवर राजेंद्र दुरुगकर, विलास गंडतवार यांनी साथ दिली. तत्पूर्वी विजयराव देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद््घाटन करण्यात आले व कलावंतांचा सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)पुतळा तोडणाऱ्यांना माफ कराहृदयनाथ मंगेशकर यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडण्याबाबत विचारले असता, पुरंदरे यांनी रायगडावर चढताना गडकरींच्या शब्दांची पदोपदी आठवण होत असल्याचे सांगत, त्यांचा पुतळा तोडणारे लहान आहेत, त्यांना क्षमा करा, अशी भावना व्यक्त केली. यावेळी पोलीस विभागातर्फे १० वाजता कार्यक्रम बंद करण्याच्या सूचनेवर त्यांनी समाचार घेतला. शिवरायांचा कार्यक्रम बंद करायला सांगता, मग गोहत्या बंद का नाही पाडत, असे ठणकावले. बाहेर देशातील लोक त्यांच्या इतिहासाचा व भाषेचा अभिमान बाळगतात. मात्र आमच्या देशात दुकानाच्या पाट्या इंग्रजीतच दिसत असल्याची खंत व्यक्त करीत, इंग्लिशच्या आहारी जाणे ही गुलामगिरी व अपराध असल्याची भावना व्यक्त केली.
जय देव जय देव जय जय शिवराया...
By admin | Published: February 07, 2017 2:02 AM