लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने गुरुवारी कचरा उठाओ आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर संघटनेचे पदाधिकारी कचऱ्याने भरलेला ट्रक घेऊन महापालिका कार्यालयावर धडकले. महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करून शहर कचरामुक्त करण्याची मागणी करण्यात आली. दोन दिवसात शहर कचरामुक्त न झाल्यास महापालिका कार्यालयात कचरा आणून टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.जय जवान जय किसान संघटनेने बजाजनगर चौकातून कचरा उठाओ आंदोलनाला सुरुवात केली. बजाजनगर चौकाच्या शेजारीच पडून असलेला कचºयाचा ढीग जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘नागपूर महानगरपालिका मुर्दाबाद’, ‘महापौर होश मे आओ’ अशा घोषणा दिल्या. बजाजनगर चौकातील कचरा उचलल्यानंतर व्हीएनआयटी रोडवरील कुजलेला कचरा उचलण्यात आला. त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी महापालिका कार्यालयावर धडकले. संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिकेचे गटनेते दुनेश्वर पेठे, अरुण वनकर यांनी दोन दिवसात शहर कचरामुक्त न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर कचरा आणून टाकण्याचा इशारा दिला. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांनी दोन दिवस कामगारांचे आंदोलन असल्यामुळे कचरा उचलल्या गेला नसल्याचे मान्य केले. लवकरच शहरातील कचरा उचलून शहर कचरामुक्त करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बीव्हीजी कंपनी झाडे लावण्याच्या करारात काळ्या यादीत गेली असताना या कंपनीशी करार कसा केला असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाºयांनी उपस्थित केला. त्यावर बीव्हीजी कंपनीविरुद्ध पुरावे सादर केल्यास करार रद्द करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. आंदोलनात जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, दुनेश्वर पेठे, अरुण वनकर, मिलिंद महादेवकर, प्रशांत नगरारे, रवींद्र इटकेलवार, रिझवान शेख, ऋषिकेश जाधव, अविनाश शेरेकर, रुद्र धाकडे, मनिषा ठाकरे, प्रमोद शेंडे, प्रवीण गुंजाळ, इर्शाद शेख, मंगेश सुरावार, दीपक दासरवार, आशिष पाटील सहभागी झाले होते.
नागपुरात जय जवान जय किसानतर्फे कचरा उठाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 9:03 PM
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने गुरुवारी कचरा उठाओ आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांना निवेदन : महापालिका कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा