नागपूर : वागदरा शिवार येथील चहा व पान टपरीच्या जागेवरून वाद झाल्यानंतर तीन मित्रांची शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण हत्या करणारा नररुपी सैतान राजू छन्नूलाल बिरहा (५५) याची तुरुंगातील वागणूक सर्वसाधारण आहे. त्याच्याविरुद्ध गैरवर्तन व बेशिस्तीची कोणतीही तक्रार नाही, अशी माहिती नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
उच्च न्यायालयाला बिरहाच्या शिक्षेवर निर्णय जाहीर करायचा आहे. त्यामुळे न्यायालयाने गेल्या ११ ऑक्टोबर रोजी बिरहाची कारागृहातील वागणूक कशी आहे, त्याच्याविरुद्ध काही तक्रारी आहेत का इत्यादी माहिती मागितली होती. त्यानुसार, संबंधित अहवाल सादर करण्यात आला. सत्र न्यायालयाने बिरहाला २८ डिसेंबर २०२२ रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयासमक्ष सादर केले आहे. तसेच, या शिक्षेविरुद्ध बिरहाने अपील दाखल केले आहे.
या प्रकरणावर गेल्या जुलैमध्ये न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला. बिरहा १७ नोव्हेंबर २०१५ पासून कारागृहात आहे. सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे तर, आरोपीतर्फे ॲड. सुमित जोशी यांनी कामकाज पाहिले.
२०१५ मधील घटना
समाजाला हादरवून सोडणारी ही घटना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १० च्या सुमारास वागदरा शिवार, ता. हिंगणा येथे घडली. मृतांमध्ये सुनील हेमराज कोटांगळे (३१), आशिष ऊर्फ गोलू लहुभान गायकवाड (२६) व कैलाश नारायण बहादुरे (३२) यांचा समावेश आहे. आरोपीने अत्यंत क्रूर व अमानवीय पद्धतीने हा गुन्हा केला.