योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका बिल्डरला ‘फिल्मी डायलॉग’ मारत सात लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली.
लक्की ऊर्फ गुज्जर पवीत गौरे (२१, रा. नवीन वस्ती, मंगळवारी, सदर) असे आरोपीचे नाव आहे. मनमोहन ओमप्रकाश मुंदडा (४८, रा. धंतोली) हे बिल्डर असून, सदर येथील नवी वस्तीत त्यांच्या सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आरोपी लक्की हा रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या साईटवर गेला. ‘तुझ्या सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तू मला सात लाख रुपये दे नाहीतर चांगले होणार नाही’, असे म्हणून खंडणी मागितली. त्यानंतर त्याने चाकू काढला व ‘माझ्यावर खूप गुन्हे दाखल आहेत, मला काहीच फरक पडत नाही. जेल माझे घरच असून, आत येणे-जाणे सुरूच असते’, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, लक्कीने १ एप्रिल रोजी देखील मुंदडा यांच्याकडे पैसे मागितले होते. तो लहान-मोठ्या चोऱ्या करतो व मुंदडा यांच्या साईटवरील कामगारांना धमकावतदेखील होता. मुंदडा यांनी पैसे हप्त्याने दिले तरी चालतील, असे तो म्हणाला होता. मुंदडा यांनी सदर पोलिस ठाण्यात याविषयी तक्रार दिली. पोलिसांनी लक्की विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.