हायकोर्ट : अमरावती जिल्ह्यात खुनाचा प्रयत्ननागपूर : खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला घटनेच्या २२ वर्षांनंतर कारावास भोगावा लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीला १ सप्टेंबरपूर्वी सत्र न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहे.दामोधर महादेव होले (५५) असे आरोपीचे नाव असून तो महादेवघाट, ता. चांदूर रेल्वे येथील रहिवासी आहे. अमरावती सत्र न्यायालयाने ३० सप्टेंबर १९९८ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास व १५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. घटना २२ वर्षांपूर्वीची असून आरोपीला शाळेत जाणारी दोन मुले आहेत. यासह विविध बाबी लक्षात घेता न्यायमूर्ती एम.एल. तहलियानी यांनी आरोपीचे अपील अंशत: मंजूर करून सात वर्षाचा कारावास दोन वर्षे सहा महिन्यांत परिवर्तित केला. सत्र न्यायालयाचा अन्य आदेश कायम ठेवण्यात आला. घटनेनंतर आरोपी केवळ एक महिना कारागृहात होता. आता त्याला उर्वरित शिक्षा भोगावी लागणार आहे.विठ्ठल नंदनकर असे जखमीचे नाव आहे. दामोधर व विठ्ठलचे शेत एकमेकाला लागून आहे. २ एप्रिल १९९२ रोजी दामोधरने पिकाला पाणी देण्यासाठी विठ्ठलला पाईप मागितले. यावरून वाद झाला. दरम्यान, दामोधरने विठ्ठलवर कुऱ्हाडीने नऊ वार केले.उपचारानंतर विठ्ठल बरा झाला. तो दोन दिवस बेशुद्ध होता. चांदूर रेल्वे पोलिसांनी घटनेचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. शासनातर्फे एपीपी राजेश नायक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
आरोपी २२ वर्षांनंतर कारागृहात
By admin | Published: July 30, 2014 1:19 AM