नागपूर : इतवारीतील मोठे जैन मंदिरातील साध्वीवर हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना तहसील पोलिसांनी अटक केली. चोरीच्या उद्देशातून आरोपींनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. रुपेश पांडे (प्रेमनगर) आणि प्रकाश आमघरे (लालगंज) अशी आरोपींची नावे असून, त्यातील रुपेश हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, तो नुकताच कारागृहातून बाहेर आला. २२ आॅगस्टला दुपारी त्याला प्रकाश भेटला. हे दोघे एकत्र दारू प्यायले. याचवेळी त्यांनी रात्रीतून चोरी करण्याची योजना बनविली. त्यानुसार, रात्री ११.५० वाजता सराफा बाजारात पोहचले. तेथून मोठे जैन मंदिराच्या त्यागी भवनात पोहचले. मौल्यवान चिजवस्तू मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र, कुलूप फोडताना आवाज आल्यामुळे ऐनवेळी साध्वीजींना जाग आली. त्या समोर येताच आरोपी रुपेशने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला आणि पळून गेले.या घटनेमुळे शांतीप्रिय जैन समाजात तीव्र रोष निर्माण झाला होता. साध्वींवर हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी चोहोबाजूने होत होती. त्यामुळे पोलिसांनी धावपळ वाढवली अखेर हे दोघे तहसील पोलिसांच्या हाती लागले. (प्रतिनिधी)
जैन साध्वी हल्ला प्रकरणात आरोपी गजाआड
By admin | Published: August 29, 2015 3:14 AM