नागपूर : इतवारीतील मोठ्या जैन मंदिरात एका जैन साध्वीवर शनिवारी मध्यरात्री हल्ला झाल्यामुळे सर्वत्र तीव्र रोष निर्माण झाला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.इतवारीतील सराफा बाजाराजवळ पार्श्वनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर आहे. बाजूलाच त्यागी भवन असून, तेथे संत, साध्वी विश्राम करतात. शनिवारी मध्यरात्री ११.४५ ते १२ च्या सुमारास त्यागी भवनात दोन हल्लेखोर आले. त्यांनी जैन साध्वींना मारहाण करून पळ काढला. या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली. माहिती कळताच मंदिर पदाधिकारी पोहचले. त्यांनी कळविल्यामुळे तहसील पोलिसाचाही ताफा आला. पदाधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. घटनेच्या वेळी हजर असलेल्यांकडून माहिती घेतल्यानंतर हल्लेखोर या परिसराची माहिती असणारांपैकी असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. हल्लेखोरांनी कोणतीही किमती वस्तू उचलून नेली नाही. त्यामुळे साध्वींवर हल्ला करण्यामागचे कारण कोणते, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. दरम्यान, शांतता आणि सद्भावनेचे प्रतीक मानले जाणाऱ्या साध्वीवर हल्ला झाल्याच्या घटनेने उपराजधानीत तीव्र रोष निर्माण केला असून, सर्व स्तरातून या घटनेचा निषेध नोंदविला जात आहे. (प्रतिनिधी)
जैन साध्वीवर हल्ला
By admin | Published: August 24, 2015 2:35 AM