जेटलींचे डोके ठिकाणावर आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:10 AM2018-06-27T01:10:33+5:302018-06-27T01:13:19+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख दुर्गा असा केला होता. आता त्याच पक्षाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे इंदिराजींची तुलना हिटलरशी करीत आहेत. या जेटलींचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला. इंदिराजींची आणीबाणी ही घटनादत्त होती. पण सध्या भाजपाने देशावर अघोषित आणीबाणी लादली आहे, असा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख दुर्गा असा केला होता. आता त्याच पक्षाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे इंदिराजींची तुलना हिटलरशी करीत आहेत. या जेटलींचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला. इंदिराजींची आणीबाणी ही घटनादत्त होती. पण सध्या भाजपाने देशावर अघोषित आणीबाणी लादली आहे, असा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.
काँग्रेसतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतापनगर रिंगरोडवरील राधे मंगलम येथे विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, किशोर गजभिये, डॉ. बबनराव तायवाडे, बाबुरावतिडके,अतुल लोंढे, धनंजय धार्मिक आदी उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी काँग्रेस नेत्यांनी संघ परिवार, भाजपा व केंद्र तसेच राज्य सरकारच्या एकूणच कारभारावर हल्ला चढविला. मुत्तेमवार म्हणाले, इंदिराजींच्या आणीबाणीचा उल्लेख विनोबा भावे यांनी अनुशासन पर्व असा केला आहे. हीटलर हा क्रूर वृत्तीचा होता. त्याने ८० लाख ज्यू लोकांना मारले. जेटली त्याच्याशी इंदिराजींची तुलना करतात. यावरून जेटलींच्या बुद्धीमत्तेची उंची लक्षात येते, अशी टीका त्यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले, इंदिराजींवर आरोप करणाऱ्यांची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. संघ परिवाराकडून आपली विचारधारा लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अभ्यासक्रम बदलण्याचे षङ्यंत्र सुरू आहे. उद्या हेडगेवारांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, हे विद्यार्थ्यांना शिकविले जाईल. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे खलनायकाप्रमाणे काम करीत आहेत. यांच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन संषर्घ करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हरिभाऊ नाईक म्हणाले, काँग्रेस नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी भाजप व संघ परिवाराचा जन्म झाला आहे. यांचा इतिहासही तसाच आहे. मात्र, काँग्रेसजनांनी आता पुढे येऊन आपल्या दैवतांचे रक्षण करण्यासाठी गरज त्यांनी व्यक्त केली. लोकांना परिवर्तन हवे आहे. याची सुरुवात भंडारा-गोंदियाच्या निवडणुकीने झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
किशोर गजभिये म्हणाले, शाहू महाराजांनी सदैव सामाजिक न्यायाची भूमिका घेतली. मात्र, सध्या देशात सामाजिक अन्यायाचे वातावरण सुरू आहे. मागासवर्गीयांवर हल्ले चढविले जात आहेत. सध्या देशात अषोषित आणीबाणी लागली असून, ती हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यासाठी काम करीत आसल्याचा आरोप त्यांनी केला. संदेश सिंगलकर यांनी आभार मानले.
एकत्र या, भाजपाला उलथवून फेका !
- जनतेला बदल हवा आहे. जनता काँग्रेसकडे आशेने पाहत आहे. अशा वेळी सर्व काँग्रेस नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगत एकत्र या व भाजपाला उलथवून फेका, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
मंत्री म्हणतात, पुन्हा सत्ता येऊ नये!वडेट्टीवार म्हणाले, मंत्रालयात मंत्र्यांपुढे व सचिवांपुढे संघाने आपले लोक बसविले आहेत. ते सरकारचा पगार घेतात व काम संघ, भाजपासाठी करतात. मंत्र्यांना तर कुठलेच अधिकार नाहीत. पुढे जर पुन्हा भाजपाची सत्ता आली तर आमचा काहीच सन्मान राहणार नाही. त्यामुळे सत्ता न आलेली बरी, असे भाजपाचे मंत्री खासगीत बोलून दाखवीत आहेत, असा चिमटाही वडेट्टीवार यांनी या वेळी काढला.