लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या १३०२ पैकी ४३० योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित योजनांची कामांची सुरु आहेत. तर काही गावांतील कामांना अद्याप सुरूवात झालेली नाही. पाणीपुरवठा योजनांची जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी असल्याने जल जीवन मिशनच्या ३०० हून अधिक योजना अडचणीत सापडल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढली असताना योजना पूर्ण होवूनही वीज पुरवठा नसल्याने गावकऱ्यांना पाणीटंचार्इचा सामना करावा लागत आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांनी जलजीवन मिशनच्या योजनांची माहिती दिली होती. पूर्वीची महावितरणची लाखो रुपयांची देयके ग्रामपंचायतींवर थकीत आहेत. यामध्ये पथदिव्यांपेक्षा पाणीपुरवठा योजनेची रक्कम अधिक आहे. काही ग्रामपंचायतींनी ही देयके विहित मुदतीत टप्पानिहाय भरली होती. तर काही ग्रामपंचायतींनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका 'जलजीवन' मधील नवीन ३०० च्या जवळपास योजनांना बसला आहे. योजनांचा वीजपुरवठ्याची प्रक्रिया पूर्वीच्या थकीत देयकांमुळे अधिक गुंतागुंतीची झाली आहे. या योजनांच्या वीजपुरवठ्यावर तत्काळ मार्ग न निघाल्यास पाणीपुरवठा अडचणीत येण्याची शक्यता आहे. गतकाळातील थकबाकीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
जिल्ह्यात १३०२ योजनांचे नियोजन
'जलजीवन मिशन' या महत्त्वाकांक्षी योजनेतून १३०२ कामांचे नियोजन करण्यात आले. डिसेंबर २०२४ पर्यंत या योजनेतील संपूर्ण कामे पूर्ण करायची आहेत. ४३० कामे पूर्ण झाली आहेत. ८६० पैकी काही योजना प्रगतिपथावर तर काही योजनांची कामे रखडली आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात ५७१ कोटी रुपयांची कामांना मंजुरी आहे.