जलालखेडा : येथील बसस्थानक या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. गत आठ दिवसांपासून बसस्थानकावरील लाइट बंद असल्याने रात्रीच्या वेळी सर्वत्र काळोख असतो. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना परिवहन महामंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. जलालखेडा हे नरखेड तालुक्यातील बाजारपेठेचे मोठे गाव आहे. जवळपास ३० ते ४० गावातील नागरिक दररोज कामानिमित्त जलालखेडा येथे येतात. सोमेश्वर किल्ला देवस्थानात शेकडो भाविक दर्शन घेतात. मोठ्या प्रमाणात येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी काटोल, वरूड येथे जातात. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर थांबावे लागते. परंतु, बसस्थानकावरील लाइट बंद असल्याने रात्रीच्या वेळी येथे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषत: तरुण मुली आणि महिलांना येथे रात्रीच्या वेळी बसच्या प्रतीक्षेत अंधारात उभे राहताना अडचणीचे ठरत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
स्वच्छतेचा अभाव
जलालखेडा येथील बसस्थानक नेहमी अस्वच्छतेबाबत चर्चेत राहले आहे. येथील बसस्थानकावर नेहमी अस्वच्छता पाहायला मिळते. सर्वत्र कचरा पसरला आहे. लाखो रुपये खर्च करून केलेले स्वच्छतागृह अजूनही सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथील बसस्थानकावर नियमित साफसफाई होणे गरजेचे आहे.
बसस्थानकावर रात्रीच्या वेळी दिवे बंद असणे दुर्दैवी आहे. शेकडो महिला प्रवासी बसस्थानकावर असतात. त्यामुळे दिवे सुरू असणे गरजेचे आहे. याबाबत संबंधितांना अवगत करण्यात आले आहे.
- प्रीतम कवरे, जिल्हा परिषद सदस्या
बसस्थानकावर दिवे नसल्याची माहिती नव्हती. शनिवारी सकाळी याबाबत माहिती मिळाली. दिवे नसल्याबाबतची माहिती देण्याची जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची होती. परंतु, त्यांनी याबाबत अवगत केले नाही. माहिती मिळताच दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एफ. रंगारी, आगर व्यवस्थापक, काटोल