नागपूर : व्रतवैकल्य, पूजापाठ म्हणजे धर्म नव्हे. धर्म म्हणजे माणसाचे माणसांशी माणसासम वागणे. दु:खी, पीडितांची सेवा म्हणजे खरा मानवतेचा धर्म हाेय. काेराेना महामारीच्या कठीण काळात जमाअते इस्लामी हिंद संघटना हेच मानवतेचे कार्य निभावत आहे. काेविड केअर सेंटर व ऑक्सिजन सिलिंडर वितरण केंद्राच्या माध्यमातून हिंदचे कार्यकर्ते सातत्यपूर्ण सेवा देत आहेत. महामारीने प्रत्येकाच्या आयुष्यात वेदना भरली आहे. या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी चालविला आहे.
जमाअते हिंदच्या माध्यमातून देशभर सेवाकार्य केले जात आहे. त्याचप्रमाणे नागपूर शहरातही सेवाव्रत चालले आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने डाेके वर काढले आणि एप्रिलमध्ये तर विषाणूने कहर केला. संसर्गजन्य आजार असल्याने कुणी कुणाच्या जवळही जाण्यास तयार नाही. अशावेळी जमाअते इस्लामी हिंदने महापालिकेच्या सहकार्याने पाचपावली येथे डेडिकेटेड काेविड केअर सेंटर एप्रिलमध्ये सुरू करण्यात आले. मेडिकल सर्विस सोसायटी ऑफ इंडिया नागपूरद्वारे या केंद्राचे संचालन केले जात आहे. जमाअतचे महाराष्ट्र अध्यक्ष रिजवानुर्रहमान ख़ान, शहर अध्यक्ष डॉ. अनवार सिद्दीक़ी, सर्विस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सिद्दीक अहमद, नागपूर अध्यक्ष डॉ. नईम नियाज़ी, माजी अध्यक्ष डॉ. सिद्दीक अहमद यांच्या मार्गदर्शनात पाचपावलीच्या सेंटरमध्ये सेवाकार्य सुरू आहे.
३०० च्यावर रुग्ण सुखरूप घरी परतले
मेडिकल सर्व्हिस साेसायटीचे माध्यम सचिव डाॅ. एम.ए. रशीद यांनी सांगितले, एप्रिलच्या महिनाभरात ३०० हून अधिक रुग्ण उपचार करून सुखरूप घरी पाेहोचले व दरराेज ५-६ रुग्ण केंद्रावर येत आहेत. जमाअतचे ४० समर्पित कार्यकर्ते या केंद्रावर निस्वार्थपणे सेवा देत आहेत. तसेच सर्व्हिस साेसायटीद्वारे डाॅक्टरांची टीम रुग्णांवर उपचार करीत आहे. विशेष म्हणजे रुग्णांना अगदी नि:शुल्क आराेग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. डॉ. इरफ़ान, डॉ. फैजान जव्वाद, डॉ. मोहम्मद आसिम, डाॅ. आसिफुजमा खान, शफीक अहमद, काजी शफीक अहमद, मोहम्मद उमर खान, शहजाद नवेद, तौसीफ जाफर, आसिम परवेज, कबीरुद्दीन खान, अल्ताफुर्रहमान आदींचा सहभाग आहे.
ऑक्सिजन सिलिंडरचेही वितरण
यादरम्यान जमाअत ए इस्लामी हिंदच्यावतीने ऑक्सिजन सिलिंडरचे नि:शुल्क वितरण केले जात आहे. गेल्या वर्षीपासून मस्जिद मरकजे इस्लामी येथील केंद्रावर ६५ सिलिंडरची व्यवस्था आहे. नुकतेच औषध बाजार, गंजीपेठ येथे नव्याने ओ-२ सिलिंडर वितरणाची सेवा सुरू करण्यात आली. येथे ३० सिलिंडर उपलब्ध करण्यात आले आहेत. गरजूंना ऑक्सिजन रिफीलिंगही करून दिली जात असल्याचे डाॅ. रशीद यांनी सांगितले.