नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - उरी (जम्मू काश्मीर) पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या आंध्र प्रदेशातील एका महिला आरोपीला घेऊन जम्मू काश्मीरचे पोलीस पथक रविवारी नागपुरात पोहचले. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून या पथकाने रविवारी रात्री नागपुरात मुक्काम केला. दरम्यान, जम्मू काश्मीर पोलिसांचे पथक नागपुरात फिरत दिसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
जम्मू-काश्मीरमधील सशस्त्र पोलिसांचे वाहन रविवारी रात्री ८ च्या सुमारास शहरात दाखल झाले. वाहनाच्या मागे ‘जम्मू-काश्मीर पुलिस’ असे लिहिलेले असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यात सशस्त्र पोलीस बसून दिसल्याने तर्कवितर्क लावले जाऊ लागले. पोलीस पथकाच्या ताब्यात दहशतवादी किंवा नक्षलवादी असावा, असाही तर्क लावला जाऊ लागला. प्रस्तुत प्रतिनिधीला ही कुणकुण लागताच त्यांनी वरिष्ठांकडे या संबंधाने विचारणा केली. त्यानंतर या वाहनाबाबत वरिष्ठांकडून सर्वत्र विचारणा होऊ लागली. पोलीस यंत्रणेची धावपळ वाढली असतानाच सीताबर्डी पोलीस ठाण्यात हे वाहन पोहचले होते. वाहनात एक पीएसआय, तसेच दोन महिला कर्मचाऱ्यांसह ६ जण होते. सूत्रांच्या माहितीनुसार, हे पोलीस पथक जम्मू-काश्मीरमधील बहुचर्चित उरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कलम ३०६ मधील एका महिला आरोपीला ताब्यात घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशात गेले होते. तेथून त्या महिला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर ट्रान्झिट वॉरंट मिळवून रविवारी हे पोलीस पथक उरीकडे निघाले. रात्री उशीर झाल्याने या पथकाने नागपुरात विश्रांती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मार्गातील पोलीस स्टेशन म्हणून या पथकाने सीताबर्डी ठाणे गाठल्याची माहिती पुढे आली.
---
... ते नक्की सांगता येणार नाही
या पोलीस पथकाच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून दिली. त्यांना आणखी काही मदत हवी का, त्याबाबतही विचारणा करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या ताब्यातील महिला आरोपी खरेच ३०६ च्या गुन्ह्यातीलच होती की, दुसऱ्या कोणत्या घातपाताच्या गुन्ह्यातील, त्याबाबत नक्की सांगता येणार नसल्याचे येथील वरिष्ठांनी स्पष्ट केले.
----