लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनमंच ही एक सामाजिक संघटना असून समाजाचेही आपण काही देणे लागतो, या उद्देशाने प्रेरित होऊन अनेक आगळे वेगळे उपक्रम राबवित असते. हे उपक्रम राबवित असताना सर्वच क्षेत्राचा विचर होत असला तरी शेतकरी आणि ग्रामीण भागातील व्यक्ती हे केंद्र बिंदू असतात, हे विशेष. ग्रामीण भागातील हुशार गरीब विद्यार्थी हे शिकवणी नसल्याने किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी मागे पडतात, ही वस्तुस्थिती आहे, अशा विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन नि:शुल्क उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आता जनमंचने पुढाकार घेत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शनपर योजना आखली आहे.शिक्षणाचे खासगीकरण झाल्यापासून शाळेतील शिक्षणाच्या जोडीने खासगी शिकवणी वर्ग अनिवार्य झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. विपरीत आर्थिक परिस्थितीमुळे खासगी शिकवणी परवडत नाही. त्यामुळे कितीही हुशार असले तरी बहुतांश ग्रामीण विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मागे पडतात. बौद्धिक कुवत असूनही संधीअभावी त्यांच्या आयुष्याची अक्षरश: माती होते. अशा रीतीने संधी नाकारल्या गेलेले हजारो तरुण शिक्षण सोडून गावागावात मोलमजुरी करताना किंवा निरुद्देश भटकताना आढळतात. केवळ संधी नसल्यामुळे प्रवाहाबाहेर फेकले जाण्याची शक्यता असलेले असे हुशार विद्यार्थी मुख्य प्रवाहात आणले जावेत म्हणून जनमंचचे विदर्भाच्या ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जनमंच प्रकाशवाट या नावाने नि:शुल्क मार्गदर्शनाची योजना आखली आहे. यासाठी तालुक्यातील प्रत्येक शाळेतून नववीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविलेले तीन ते चार विद्यार्थी मार्गदर्शनाकरिता निवडण्यात येतील. त्या-त्या तालुक्याच्या शाळेतील मुख्याध्यापकांचे सहकार्य घेण्यात येईल. सुमारे १५० विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी तज्ज्ञ शिक्षकांकडून नि:शुल्क शिकवणी वर्ग चालविले जातील.सुमारे पाच आठवड्यांच्या या वर्गात गणित, सायन्स आणि इंग्रजी या कठीण मानल्या जाणाऱ्या विषयांचा वर्षभराचा अभ्यास करून घेतला जाईल. शालेय विषयांसोबतच विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात येईल. त्यामध्ये एकाग्रता प्रशिक्षण, सकारात्मक विचार, देहबोलीचे महत्त्व, सोशल मीडियाचा योग्य वापर, मुलामुलींचे परस्पर संबंध इंग्रजी संभाषण कला इत्यादी विषयांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना लागणारे अभ्यास साहित्य जनमंचतर्फे पुरवले जाईल.दिवाळीच्या सुटीत याच विद्यार्थ्यांसाठी उजळणी वर्ग घेतले जातील. शिवाय त्यांच्यासाठी असाच अभ्यासक्रम दोन वर्षानंतर, बारावीच्या परीक्षेच्या आधीसुद्धा राबवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.तीन वर्षात विदर्भाच्या सर्व ११६ तालुक्यांमध्ये योजना राबवणारजनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी सांगितले की, यावर्षी एका तालुक्यापासून सुरु होत असलेला हा प्रकल्प येत्या तीन वर्षाच्या आत विदर्भाच्या ११६ तालुक्यांमध्ये सुरु होईल आणि त्याचा लाभ सुमारे १५ ते २० हजार विद्यार्थ्यांना मिळेल. बारावीचे मार्गदर्शन सुरु झाल्यावर ही संख्या दरवर्षी सुमारे २२ हजाराच्या घरात जाईल. एवढ्या मोठ्या प्रमाणातील हा उपक्रम लोकसहभागाशिवाय शक्य नाही. त्यामुळे लोकांकडूनही मदत घेतली जात आहे. याला लोकांकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अनेक शिक्षकही नि:शुल्क शिकवण्यासाठी तयार झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. मदत करणाºयांनी आमच्या प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष अनुभवावे, असे आवाहन प्रा. शरद पाटील यांच्यासह राजा आकाश, अमिताभ पावडे, प्रमोद पांडे, मनोहर रडके, मनोहर खोरगडे, प्रभाकर खोंडे, उत्तम सुळके, प्रदीप निनावे, राम आखरे, सुहास खांडेकर यांनी केले आहे.मूर्तिजापूर येथून पथदर्शी प्रकल्पाची सुरुवातनागपूरचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेल्या या योजनेचा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील भारतीय ज्ञानपीठ हायस्कूलमध्ये २० ते २४ जून या काळात राबविण्यात येत आहे. २० मे रोजी सकाळी १०.३० वाजता अकोल्यातील प्रभात किडस विद्यालयाचे संचालक गजानन नारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उदघाटन होईल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पुढे येऊन नुकतीच आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झालेला नितीश पाथोडे हा तरुण यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहील. भारतीय ज्ञानपीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास सावरकर अध्यक्षस्थानी राहतील. तसेच या दरम्यान एकूण पाच रविवार येत आहेत प्रत्येक रविवारी हे एखाद्या विशिष्ट मान्यवरांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. तसेच प्रसिद्ध मोटिव्हेशनर सचिन बुरघाटे हे समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राहतील. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने या उपक्रमाची सांगता होईल.