लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आषाढ महिना आला की वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागते. त्या वाटेने लागलेल्या वारकऱ्यांना टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे नामस्मरण करताना देहभान हरपल्याचा भास होतो, म्हणूनच संतांनीही नामस्मरणालाच अधिक महत्त्व दिले. नामस्मरणात रंगलेला सांसारिक माणूसही ‘जनविजन झाले आम्हा...’प्रमाणे पांडुरंगाचा अनुग्रह प्राप्त करतो. संतांच्या अभंगातील भक्तिमय स्वरधारांमधून वारकऱ्यांना मिळणारा नामस्मरणाचा अनुग्रह रसिकांनी अनुभवला. निमित्त होते सप्तकतर्फे आयोजित ‘सावळा घन’ या भक्तिमय कार्यक्रमाचे.‘सावळा घन’च्या रूपाने कविकुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टीम येथे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा वैशंपायन, समीहन कशाळकर व सौरभ काडगावकर या तरुण गायकांनी त्यांच्या स्वरांमधून भक्तीच्या अमृतधारा बरसवल्या की, सभागृहात उपस्थित प्रत्येक श्रोता पांडुरंगाच्या भक्तिरसात न्हाऊन निघाला. मुग्धा यांनी ‘जनविजन झाले आम्हा...’ने या कार्यक्रमाला सुरुवात केली. टिळा लावणे, अंगाला राख फासणे म्हणजे वैराग्य नाही. वैराग्य, संन्यास हे बाह्यवेश नसून मनाची घडणे होय. संसाराबद्दल विराग आणि भगवंताबद्दल अनुराग हे वैराग्य. कुणी संसारात राहूनही भक्तिमार्गाने वैराग्य ध्यान मिळवू शकतो. भक्तीचा सोपा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण. देव कळतो तो नामस्मरणातून, त्यासाठी वेदांचे ज्ञान कळणे गौण ठरते. संतांच्या अभिवचनातील हा सार उलगडणारा ‘आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण...’ हा अभंग सौरभ यांनी सादर करून श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. समीहन यांनी पुढे शास्त्रीय अनुरागातील ‘पुंडलिका भेटी...’मधून पांडुरंगभेटीचे मोल उजागर केले. मुग्धा यांनी ‘श्रीरंगा कमलाकांता...’ हे गोपिकांचा भक्तिनाद उलडणारे नाट्यपद तेवढ्याच तल्लीनतेने सादर केले. पुढे या भक्तिमय स्वरधारा अशाच बरसत राहिल्या आणि श्रोत्यांना चिंब करून गेल्या. ‘तल्लीन होऊन नाचू दे..., कान्होबा, तुझी घोंगडी..., काय शोधिसी तू..., कानडा राजा पंढरीचा..., सगुण सुंदर..., सरीवर सरी..., माझे माहेर पंढरी..., कोण पुण्य गाठी..., मन आनंद आनंद..., अगा वैकुंठीच्या राया...’ असा सुरेल स्वरांचा भक्तिनाद रसिकांच्या कानामनात भिनला.कार्यक्रमात श्रीकांत सूर्यवंशी, राजन भावे, आशिष मुजुमदार, उज्ज्वला गोकर्ण, निनाद सोलापूरकर, नितीन वानखेडे यावाद्यकलावंतांनी भक्तिसंगीताचा गजर केला. कार्यक्रमाचे सुरेख निरुपण रेणुका देशकर यांनी केले. कार्यक्रमात समीर बेंद्रे, मिलिंद कुकडे, भारतभूषण जोशी, अमित दिवाडकर, डॉ. उदय गुप्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.