लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्याला आयुष्यात वेगळे काहीतरी ध्येय गाठायचे होते. संगणक विज्ञानात पदवी घेतल्यानंतरही त्याची ही धडपड सुरू होती. नाटकात काम केले, दोन चित्रपटातही काम केले, पण मार्ग गवसत नव्हता. एकदा मित्राने जपानी भाषा शिकण्याविषयी चर्चा केली आणि त्याने ठरवले, आपण जपानला जायचे. ही भाषा शिकून तो जपानला गेला. तेथेही भाषेचा अभ्यास केला व एका मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी मिळविली. अवघे २९ वर्षे वय असलेल्या या तरुणाचे नाव आहे पंकज ज्ञानेश्वर थूल.पंकज हा विश्वकर्मानगरमध्ये राहणारा सामान्य घरचा तरुण. वडील सेल टॅक्समध्ये असल्याने परिस्थितीही चांगलीच. तो अभ्यासातही हुशार होता. कम्युटर सायन्समध्ये बीएससी व डीएडही त्याने केले होते. पण घरच्यांना काळजी होती कारण कुठल्याच कामात त्याचे लक्ष लागत नव्हते. कधी नाटकात काम कर तर कधी चित्रपटात. खासगी शिकवणी वर्गही घ्यायचा. मात्र शिक्षक बनावे हा वडिलांचा सल्ला त्याला मान्य नव्हता. यादरम्यान लोकमत युवा नेक्स्टमध्ये कार्य केल्यामुळेही त्याची दृष्टी स्पष्ट होण्यास मदत मिळाल्याचे त्याने सांगितले.यादरम्यान पंकजने काही महिने जपानी भाषेचे वर्ग सुरू केले. पण येथे बोलणारा कुणी नाही. त्यामुळे जपानलाच जाऊन भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचा विचार केला आणि जानेवारी २०१८ मध्ये तो जपानला गेला. शैक्षणिक व्हिसा काढून त्याने जपानमध्ये भाषीय अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. वडिलांनी जाण्यासाठी मदत केली पण जपानमध्ये त्याला स्वत: संघर्ष करावा लागला. तेथे पार्टटाईम काम करून त्याने पदवी पूर्ण केली. यादरम्यान काही कंपन्यामध्ये मुलाखती त्याने दिल्या आणि एका टेक्सर्टाइल कंपनीत त्याला मार्केटिंग मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. गेल्या दोन वर्षांपासून तो जपानमध्ये असून त्याने सामाजिक ओळखही निर्माण केली आहे. भारतात येऊ इच्छिणाऱ्या भारतीय माणसांना तो मार्गदर्शन करीत असतो. विदेशी भाषांचे ज्ञान हे करिअरचे एक उत्तम साधन होऊ शकते, हे पंकज थूलच्या उदाहरणावरून दिसून येते.पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान निवडभारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर २०१८ मध्ये जपान दौºयावर गेले होते. त्यावेळी दुभाषिकांच्या व्हॉलेन्टियर टीममध्ये निवड झालेला पंकज हाही एक होता. त्यावेळी विविध चर्चांमध्ये सहभागी झाल्याचे त्याने सांगितले.भारतीयांबद्दल प्रचंड आदरजपानी माणसे स्वभावाने अत्यंत मृदू असतात. आपल्या वागण्याने कुणाचाही अनादर होणार नाही, याची काळजी ते सातत्याने घेत असतात. कामाबाबत अत्यंत प्रामाणिक आणि वेळेचे काटेकोर पालन करणारे असतात. पुढल्या वर्षी जपानमध्ये ऑलिम्पिक होणार असून तीन वर्षापूर्वीच त्यांनी तयारी सुरू केल्याचे पंकजने सांगितले. जपानच्या प्रत्येक माणसाला भारतीयांबाबत प्रचंड आदर आहे. एकतर भारत हा तथागत बुद्धाचा देश व दुसरीकडे आयटी क्षेत्रात भारतीय तरुणांची बुद्धी सर्वोत्कृष्ट असल्याचे ते मानतात. जपानच्या सर्वच भागात भारतीय खाद्य आणि साहित्य मिळत असल्याचेही पंकजने सांगितले.
जपानी भाषेने दिली त्याच्या ‘करिअर’ला दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:00 PM
त्याला आयुष्यात वेगळे काहीतरी ध्येय गाठायचे होते. संगणक विज्ञानात पदवी घेतल्यानंतरही त्याची ही धडपड सुरू होती. नाटकात काम केले, दोन चित्रपटातही काम केले, पण मार्ग गवसत नव्हता.
ठळक मुद्देनागपूरच्या तरुणाचे जपानमध्ये यश