लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेयसीसाठी एका प्रियकराने चक्क पर्शियन मांजर चोरली. अतिशय आकर्षक दिसणारी ही मांजर चोरीला गेल्याची तक्रार मिळताच सक्रिय झालेल्या मानकापूर पोलिसांनी एका प्रेमीयुगुलाला शोधले. त्यांच्या ताब्यातून डॉक्टरकडील ती मांजर ताब्यात घेतली आणि मूळ मालकाच्या ताब्यात दिली.मानकापुरात राहणारे डॉ. अंशुमन शाहिद यांना मांजरांचा खूप लळा आहे. त्यांच्याकडे तीन पर्शियन मांजर आहेत. पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणाऱ्या या मांजरापैकी एक शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाले. ते चोरून नेल्याचा अंदाज येताच डॉ. शाहिद यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. एरवी पशुपक्ष्यांच्या चोरी, बेपत्ता होण्याची पोलीस फारशी गांभीर्याने दखल घेत नाही आणि ते शोधून काढण्यात तत्परताही दाखवत नाही. मात्र, मानकापूरचे ठाणेदार वजीर शेख यांनी लगेच मांजराच्या शोधार्थ एक चमू कामी लावली. पोलिसांनी प्रारंभी डॉ. शाहिद यांच्या घराच्या आजूबाजूलाच चौकशी सुरू केली. बाजूला राहणाºया एका तरुणीकडे एक आकर्षक मांजर असल्याचे पोलिसांना कळाले. त्यामुळे पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. तिने तिचा हर्षल मानापुरे नामक प्रियकराने हे मांजर आणून दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी हर्षलला ताब्यात घेऊन विचारपूस केली. प्रेयसीला हे मांजर खूप आवडायचे म्हणून ते चोरून तिला भेट दिल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी हर्षल व त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले.किंमत ३० हजार!पोलिसांनी प्रेमीयुगुलाच्या ताब्यातील हे मांजर लगेच ताब्यात घेतले आणि मूळ मालक डॉ. शाहिद यांच्या हवाली केले. डॉ. शाहिद यांनी ते हातात घेताच एखाद्या मुलाप्रमाणे ते मांजर त्यांच्या छाती-पोटावर खेळून आपले प्रेम व्यक्त करू लागले. बराच वेळपर्यंत ते मांजर डॉ. शाहिद यांच्या हातून खाली उतरण्याचे नाव घेत नव्हते. या मांजराची किंमत ३० हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. मुक्या जीवाला त्याच्या मूळ मालकाच्या हवाली करण्याची कामगिरी ठाणेदार वजीर शेख यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मिश्रा तसेच पोलीस कर्मचारी संतोष राठोड, प्रमोद दिघोरे, राजेश वरठी आणि रोशनी यांनी बजावली.