- विहिंपचे मिलिंद परांडे यांनी केली कारवाईची मागणी : ‘हिजाब डे’च्या दिवशी नागपुरात घडलेल्या प्रकाराबद्दल विचारला जाब
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बॉलिवूडचे चित्रपट लेखक व गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानसोबत केलेली तुलना बघता, त्यांचा बोलविता धनी देवबंद असल्याचे दिसून येते. इतर धर्मीयांसोबतच स्व:धर्मीय महिला-बालकांवर अत्याचार करणाऱ्या तालिबानची संघ, विहिंप, बजरंग दलाशी तुलना करणारे अख्तर स्वत:ला भारतीय मानतात की परकीय आक्रमकांचे वंशज, हे त्यांनी स्पष्ट करावे व केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी सोमवारी नागपुरात पत्रपरिषदेतून केली. या वेळी विहिंपचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे व प्रांत प्रचार प्रमुख निरंजन रिसालदार उपस्थित होते.
नागपुरात दोन दिवसांपूर्वी ‘हिजाब डे’निमित्त हिंदू तरुणींना जबरीने बुरखा घालण्याचा प्रकार घडला. या तालिबानी मानसिकतेला आवरण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरले असून, तक्रारीनंतर केवळ त्यांना माफी मागण्यास लावण्यात आली. एका धर्माच्या उपासकांनी दुसऱ्या धर्माच्या उपासकांच्या स्वातंत्र्यावर केलेला हा प्रहार असून, यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणीही या वेळी मिलिंद परांडे यांनी केली.
-----------
डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीराम गर्भगृहात विराजणार
काहीच दिवसांपूर्वी अयोध्येला गेलो असता, श्रीराम मंदिराच्या निर्माणाची गती बघता डिसेंबर २०२३ पर्यंत गर्भगृहाचे काम पूर्ण होऊन श्रीराम मूर्तीची स्थापना गर्भगृहात होईल, अशी अपेक्षा मिलिंद परांडे यांनी या वेळी व्यक्त केली. श्रीराम मंदिराच्या कामात असलेल्या ३० टक्के पाषाणशिल्पांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ७० टक्के पाषाणशिल्पे कोरण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
------------
गंगा-जमुनी तहजीब आम्हाला मान्य नाही
गंगा-जमुनी तहजीब हा भ्रमाचा भोपळा असून, ही तहजीब कशी मान्य करावी, असा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी गंगा व यमुना नदीच्या संगमातून जो प्रवाह पुढे निघतो, त्याला सर्वत्र गंगानदी हेच नाव आहे. त्याचप्रमाणे हिंदू किंवा मुस्लीम एकत्र येतात तेव्हा ती संस्कृती या देशाची असली पाहिजे, असे परांडे म्हणाले. या देशाची संस्कृती हिंदूच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यासोबतच छत्तीसगढ येथे जन्माष्टमीच्या पर्वावर जनजातीय समाजाच्या बालकांना प्रताडित करून आस्थांवर आघात पोहोचविण्याचा त्यांनी निषेध केला. ओटीटी प्लॅटफाॅर्मवर सुरू असलेल्या ‘एम्पायर’ या वेबसिरिजवर प्रतिबंध घालण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.