नागपूर : कोरोनातून बाहेर पडत नाही तोच ४३ वर्षीय रुग्णाला गंभीर स्वरुपाचा म्युकरमायकोसिस झाला. शस्त्रक्रिया करून वरचा जबडा काढावा लागला. यामुळे बोलणे, खाणे बंद झाले. चेहऱ्यावरील व्यंगत्वामुळे त्यांनी आत्मविश्वासही गमावला. अशा स्थितीत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय त्यांच्या मदतीसाठी धावून आले. अथक परिश्रमाने कृत्रिम जबडा तयार केला. त्याच्या प्रत्यारोपणाची अत्यंत गुतागुंतीची शस्त्रक्रियाही यशस्वी केली. म्युकरमायकोसिसनंतरचे हे पहिलेच जबडा व दंत प्रत्यारोपण ठरले. सध्या रुग्णालयाकडे ७० रुग्ण या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. (Jaw and dental implants for the first time after mucormycosis)
म्युकरमायकोसिसवरील उपचार, शस्त्रक्रिया व पुनर्वसनाबाबत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून ही माहिती दिली. ते म्हणाले, कोरोना काळात रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टरनी धोका पत्करुन रुग्णसेवा दिली. परंतु कोरोनानंतर अचानक वाढलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमुळे रुग्णालयासमोर एक आव्हान उभे ठाकले. म्युकरमायकोसिसच्या ११८ रुग्णांची नोंद झाली. यातील ६० रुग्णांवर शस्त्रक्रिया करून कोणाचा खालचा तर कोणाचा वरचा जबडा काढावा लागला. नागपूर एम्समधील १० रुग्णांवरही आम्ही शस्त्रक्रिया केली. सध्याच्या स्थितीत ७० रुग्ण जबडा व दंत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहे. ‘इम्प्लांट’ तयार करणे व बसविणे ही खर्चिक बाब आहे. यामुळे या रुग्णांसाठी येणारा खर्चाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यास प्रत्यारोपणाला सुरूवात होईल, असेही डॉ. दातारकर म्हणाले. पत्रपरिषदेला डॉ. अरुण खळीकर, डॉ. वर्षा मानेकर व डॉ. वैभव कारेमोरे उपस्थित होते.
-टायटॅनियम धातूद्वारे कृत्रिम जबडा
डॉ. दातारकर म्हणाले, कृत्रिम जबडा व दंत प्रत्यारोपण करण्यात आलेला सूरज जयस्वाल हा पांढरकवडा येथे राहतो. म्युकरमायकोसिसच्या निदानानंतर रुग्णालयातील मुखशल्यचिकित्सा विभागाने त्यावर शस्त्रक्रिया करीत वरच्या जबड्याचा काही भाग काढला. तीन महिन्यांनंतर कृत्रिम जबडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. टायटॅनियम धातूद्वारे कृत्रिम जबडा तयार केला. यासाठी एका खासगी कंपनीने मदत केली. आता जबड्यात कृत्रिम दात बसविण्याची प्रक्रिया होणार आहे.
- पोस्ट म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी राज्यातील पहिले केंद्र
म्युकरमायकोसिसच्या उपचारानंतर आता पोस्ट म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांवरील उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु नवीन जागा घेऊन अडचणी निर्माण होऊ नये म्हणून अधिष्ठात्यांची कार पार्किंग जिथे केली जाते तिथे हा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात पहिल्यांदाच हे ‘पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस मॅक्सीलो फिशल रिहॅबिलिटेशन सेंटर’ असणार आहे, अशी माहिती डॉ. दातारकर यांनी दिली.
- १० रुग्णांना कृत्रिम डोळे
काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसमुळे डोळे गमावण्याची वेळ आली. दंत रुग्णालयात अशा १० रुग्णांवर कृत्रिम डोळे तयार करण्याचे कार्य हाती घेतले आहे. हे डोळे दुरून पाहिल्यावर खरोखर सारखेच दिसतील असे आहेत, अशी माहिती डॉ. अरुण खळीकर यांनी दिली.