- योगेश पांडे नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असताना केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीदेखील इंग्रजांची माफी मागितली होती असा दावा रविवारी येथे केला. नागपुरात आयोजित ‘लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते. या ‘कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार डॉ.विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते.
जालियनवाला नरसंहारानंतर उफाळलेला असंतोष आणि अकालींचे आंदोलन यादरम्यान पंजाबमधील नाभा संस्थानात बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु मातीच्या भिंती असलेल्या तुरुंगात राहणे नेहरू यांना सहन झाले नाही व पुन्हा संस्थानात प्रवेश करणार नाही या आशयाचा लेखी माफीनामा त्यांनी दिला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी व्हाइसरॉयकडे रदबदली केली. त्यामुळे दोन आठवड्यात शिक्षा माफ झाली, असा घटनाक्रम ठाकूर यांनी सांगितला.
यावेळी अनुराग सिंह ठाकूर यांनी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी तसेच बिहार सरकारवर सडकून टीका केली. राहुल गांधी यांच्या ‘माफी मागायला मी सावरकर नाही’ हे वक्तव्य म्हणजे ते कधीच सावरकर होऊ शकत नाहीत, ही कबुली आहे. कारण तशी तपस्या व त्याग असावा लागतो. कुणाचा सन्मान करू शकत नसाल तर कमीत कमी अपमान करायला नको, असे ठाकूर म्हणाले. स्वत: राहुल गांधी यांनी २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. आता ते म्हणतात की ‘गांधी कधीच माफी मागत नाहीत’. यातून त्यांचा अहंकार दिसून येताे. त्यांची खासदारकी रद्द करण्यात केंद्राची काहीच भूमिका नाही, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
'लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्ह'मध्ये ‘एएनआय’च्या संपादक स्मिता प्रकाश, न्यूज १८ (हिंदी)चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, न्यूज १८-लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, पंजाब केसरी व नवोदया टाईम्सचे कार्यकारी संपादक अकु श्रीवास्तव, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार एस.एन.विनोद, हिंदुस्तान टाईम्सचे सहयोगी संपादक प्रदीपकुमार मैत्र, एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बावीस्कर प्रत्यक्ष तर टाईम्स नेटवर्कच्या समूह संपादक नविका कुमार आभासी पद्धतीने सहभागी झाल्या. लोकमत डिजिटलचे संपादक आशीष जाधव व लोकमत समाचारचे सहयोगी संपादक संजय शर्मा यांनी या सर्वांना बोलते केले.
बिहारमध्ये ‘जंगलराज रिटर्न्स’, पुरस्कारवापसी गॅंग कुठे आहे ?बिहार व पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून अनुराग सिंह ठाकूर यांनी टीकास्त्र सोडले. बिहारमध्ये काही विशिष्ट लोक सत्तेवर आले की तेथे हिंसा वाढते. आताची स्थिती पाहून तेथे ‘जंगलराज रिटर्न्स’ असेच म्हणावे लागले. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तुष्टीकरणाचे राजकारण करत असून तेथील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. हाच प्रकार भाजपशासित राज्यात झाला असता तर काही बुद्धिजीवींनी आक्रोश केला असता. मात्र आता ती पुरस्कारवापसी गॅंग कुठे गेली आहे, असा सवाल अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला. दिल्लीत केजरीवाल यांचे तीन मंत्री तुरुंगात असूनदेखील ते जगाला ज्ञान वाटत आहेत, अशी टीकादेखील त्यांनी केली.
माध्यमांची भूमिका राष्ट्रहिताची हवीपंतप्रधान मोदी हे काही पत्रकारांच्या मनात आहेत तर काहींच्या डोक्यात आहेत. मात्र विकसनशील देशातून विकसीत देशाकडे जाण्याची वाटचालीत माध्यमांची भूमिका ही सकारात्मक व राष्ट्राच्या हिताची असायला हवी, असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले.