कामठी (नागपूर) : येरखेडा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच जयंत यशवंत मेश्राम (४४) रा. रामकृष्ण ले-आउट, न्यू येरखेडा यांनी रनाळा शिवारात झाडाखाली विष प्राशन करून आत्महत्या केली. गुरुवार सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेश्राम हे मंगळवारी (दि.३१) मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घरी मोबाईल फोन व सोन्याची अंगठी ठेवून ॲक्टिवा गाडी क्रमांक एम.एच.४०-सी.बी.००४२ ने घरून निघून गेले. बराच वेळहून ते घरी परत आले नसल्याने त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा मेश्राम (३४) यांनी नातेवाईकांकडे त्यांच्याबाबत चौकशी केली. शेवटी कुठेही त्यांचा शोध लागला नसल्याने अन्नपूर्णा यांनी याबाबत नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी मिसिंगची तक्रार नोंद करून तपास सुरू केला.
गुरुवारी सकाळी १० वाजता सुमारास रनाळा शिवारात फोर लेन रिंग रोडच्या बाजूने कच्चा मार्ग असून एका झाडाखाली जयंत यांचा मृतदेह एका नागरिकाला दिसून आला. नागरिकांनी याबाबत नवीन कामठी पोलीस ठाण्यात माहिती दिली. लागलीच ठाणेदार संतोष वैरागडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. जयंत यांच्या मृतदेहाजवळ ॲक्टिवा गाडी, दारूची बाटली व कीटकनाशकची बाटली आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. शवविच्छेदनानंतर जयंत यांच्या पार्थिवावर राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली केली आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. पिल्ले करीत आहेत. जयंत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.
जयंत भाजपाचे पदाधिकारी
जयंत यशवंत मेश्राम हे २००२ ते २००७ दरम्यान येरखेडा ग्रामपंचायतचे उपसरपंच होते. त्यानंतरसुद्धा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झाले होते. सध्या ते भाजपचे पदाधिकारी होते. पण त्यांनी इतकी टोकाची भूमिका कशासाठी घेतली, याबाबतचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.