कर्नाटकात जाण्यासाठी जयेश पुजारीची हायकोर्टात याचिका
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 30, 2023 05:41 PM2023-05-30T17:41:36+5:302023-05-30T17:42:02+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा आरोपी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ठार मारण्याची धमकी देऊन दहा कोटी रुपये खंडणी मागणारा आरोपी जयेश ऊर्फ शाहीर ऊर्फ शाकीर शशिकांत पुजारी याने स्वत:ला कर्नाटक येथील बेळगाव मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने मंगळवारी राज्याच्या गृह विभागाचे सचिवांसह इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर अवकाशकालीन न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुजारी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. येथे जीवाला धोका आहे, असे त्याचे म्हणणे आहे. याशिवाय, त्याच्याविरुद्ध कर्नाटकमध्ये दोन फौजदारी खटले प्रलंबित आहेत. या आधारावरही त्याला स्थानांतरण हवे आहे. आधीच्या एका खून प्रकरणात त्याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित केली.
यापूर्वी तो बेळगाव कारागृहात होता. तेथून त्याने १४ जानेवारी व २१ मार्च २०२३ रोजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन केला आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, दहा कोटी रुपये खंडणी मागितली. यासंदर्भात धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पुजारीला ३ एप्रिल २०२३ रोजी अटक करून नागपूरला आणण्यात आले. पुजारीतर्फे ॲड. नितेश समुंद्रे यांनी बाजू मांडली.