नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारीला धंतोली पोलिसांनी सोमवारी दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
जयेशने १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी गडकरींच्या कार्यालयात खंडणीचे फोन केले. त्याला पहिल्यांदा पैसे न दिल्याने बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली होती. या दोन्हीप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जयेशला कर्नाटकातील बेळगाव कारागृहातून दि. २८ मार्च रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याला १४ जानेवारीच्या गुन्ह्यात अगोदर अटक करण्यात आली होती व रविवारी त्याची कोठडी संपली. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात झाली होती. आता दि. २१ मार्चच्या गुन्ह्यात त्याला प्रोडक्शन वॉरंटसह ताब्यात घेण्यात आले.