नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीर कांथा याने कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना जीवे मारण्याची सुपारी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लष्कर-ए-तोयबा आणि पीएफआय या दहशतवादी संघटनांनी त्याला ईश्वरप्पांची सुपारी दिली होती. मात्र त्याअगोदरच तो या प्रकरणात अडकला.
जयेशने त्याच्या एका साथीदाराला कारागृहातून बाहेर काढून शस्त्रांसाठी पैसेही उपलब्ध करून दिले होते. जयेशचे कर्नाटक आणि दक्षिण भारतातील बहुतांश शहरांमध्ये मजबूत दहशतवादी 'नेटवर्क' होते. त्यामुळेच त्याला ही सुपारी देण्यात आली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी बेळगाव कारागृहातून जामिनावर सुटलेल्या रझियाच्या प्रियकराला त्याने शस्त्रे खरेदी करण्यासाठी पैसे दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. जयेश आणि त्याचे साथीदार खून करण्याची संधी शोधत होते. दरम्यान, गडकरींच्या कार्यालयात फोन केल्यानंतर जयेश नागपूर पोलिसांच्या 'टार्गेट'वर आला. ईश्वरप्पा हे कर्नाटक भाजपचे प्रभावी नेते आहेत. शिमोगा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या हत्येच्या सुपारीचे वृत्त समोर आल्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
जयेशने आसाममध्ये बॉम्ब बनविण्याचे घेतले धडे
दहशतवादी संघटनांशी संबंधित जयेश उर्फ शाकीर कांताने भारतात हिंसा घडविण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या मो.फहाद या आरोपीकडून बेंगळुरू तुरुंगात बॉम्ब बनविण्याचे धडे घेतले होते. रुंगातून पळून आल्यानंतर त्याने आसाममध्येही बॉम्ब बनवण्याचे कौशल्य विकसित केले होते. यातून जयेश उर्फ शाकीरला देशभरात स्फोट घडवायचे होते. मात्र अनेक सहकाऱ्यांच्या अटकेमुळे तो योजना अंमलात आणू शकला नाही.
२०१२ मध्ये बेंगळुरू तुरुंगात अटक झालेला जयेश लष्कर-ए-तोयबा आणि अल बदरचा दहशतवादी आणि कराचीचा रहिवासी मो. फहाद भेटला. २००६ आणि २००८ मध्ये बॉम्बस्फोट घडवून म्हैसूर पोलिस पथकावर गोळीबार केल्याप्रकरणी फहादला पकडण्यात आले होते. त्याचे आई-वडील कराचीत राहतात. रसायनतज्ज्ञ फहादला बॉम्ब बनवण्यात निपुणता होती. तुरुंगात असताना त्याने जयेशला बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले. यानंतर जयेश तुरुंगातून पळून आसामला गेला. तेथील दहशतवादी तळात पुन्हा बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. जयेशचे काश्मीरमधील तुरुंगात असलेला दहशतवादी अली हसन याच्याशीही संबंध आहे. दहशतवादी पाशाच्या सांगण्यावरून त्याने पाकिस्तानातून पाठवलेली शस्त्रे रहमान नावाच्या दहशतवाद्यापर्यंत पोहोचवली होती. याशिवाय डी कंपनीचे रशीद मलबारी, मांडरू युसूफ आणि गणेश शेट्टी यांच्याशीही त्याचे संबंध होते.