लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आयआयटी’सह देशातील महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-मेन्स’च्या तिसऱ्या प्रयत्नाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री घोषित करण्यात आला. नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या चार संधींपैकी ही तिसरी परीक्षा होती. रात्री उशिरापर्यंत निकालाचे विश्लेषण सुरू असल्याने अव्वल आलेल्या विद्यार्थ्याचे नाव कळू शकले नाही. मात्र, विविध कोचिंग क्लासेसकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वृत्त लिहिस्तोवर ४०हून अधिक विद्यार्थ्यांचा ‘स्कोअर’ हा ९९ पर्सेंटाइलहून अधिक होता. देशभरात १७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले. नागपुरात किती ते कळू शकले नाही.
नियोजित वेळापत्रकानुसार ‘जेईई-मेन्स’च्या तिसऱ्या टप्प्याची परीक्षा २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार होती. मात्र, कोरोनामुळे एनटीएने परीक्षा पुढे ढकलली. २०, २२, २५ व २७ जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात आली. ‘कोरोना’चा प्रकोप अद्यापही कायम असल्याने ‘ऑनलाइन’ माध्यमातून ही परीक्षा झाली. नागपूर तसेच विदर्भातील विविध महाविद्यालयांतून सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नागपुरातून ‘जेईई-मेन्स’ची परीक्षा दिली.
आता शेवटची संधी
९५हून अधिक पर्सेंटाइलचा ‘स्कोअर’ असूनदेखील विद्यार्थी आणखी नव्या जोमाने पुढील परीक्षा देण्यासाठी तयारी करत आहेत. आता आणखी एक प्रयत्न विद्यार्थी करू शकतात. २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अखेरच्या संधीची परीक्षा होणार असून, बहुतांश विद्यार्थ्यांनी या टप्प्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.