नागपूर : गोंदिया-इतवारी पॅसेंजर गाडीतील एका महिलेची सोन्या-चांदीचे दागिने असलेली पर्स चोरी करणाऱ्या महिलेस इतवारी लोहमार्ग पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या कामठी चौकीतील उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन यांनी इतवारी लोहमार्ग पोलिसांना सूचना देऊन गोंदिया-इतवारी पॅसेंजरच्या जनरल कोचमधील महिला प्रविना संजय घरडे (३५) रा. सुगतनगर या कामठी रेल्वेस्थानकावर उतरताना अज्ञात आरोपीने सोन्या-चांदीचे दागिने असलेली पर्स चोरी केल्याचे सांगितले. ही गाडी कळमना रेल्वेस्थानकावर येत असून चोरी करणारी महिला आरोपी असल्याची सूचना इतवारी लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यावर लगेच लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली इतवारी लोहमार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख यांनी उपनिरीक्षक राजेश वरठे, शिपाई सतीश बोरडे, दीप्ती बेंडे, धम्मा गवई, अमित अवताडे यांना सोबत घेऊन कळमना रेल्वेस्थानक गाठले. तेथे रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने चोरी करणाऱ्या सिमरन दयानंद पेंडारे (३०) रा. कन्हान या महिलेस ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ४०० रुपये असा ४८५०० रुपयांचा मुद्देमाल असलेली पर्स ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. इतवारी लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्यामुळे संबंधित महिलेचे दागिने परत मिळाले आहेत.
................