समितीची सरकारला विनंती : आज मुदत संपणार नागपूर : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीची तीन महिन्यांची मुदत २३ सप्टेंबर रोजी संपत आहे. परंतु चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. या चौकशीसाठी आणखी तीन महिने मुदतवाढ मिळावी, अशी विनंती समितीने राज्य सरकारला केली आहे. यासंदर्भात शासनाकडून अद्याप कुठलेही उत्तर आले नसले तरी चौकशी समितीच्या आजवरच्या कामाची एकूण पद्धत पाहता शासनातर्फे समितीला ही मुदतवाढ मिळेल, अशी खात्री आहे. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीवरून खडसे यांच्यावर आरोप होते. त्यामुळे त्यांना जूनमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी न्या. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. नागपूर येथील रविभवनातून या समितीचे चौकशीचे काम सुरू आहे. तीन महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. २३ जून रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानुसार २३ सप्टेंबर रोजी चौकशी समितीची तीन महिन्यांची मुदत पूर्ण होते. मात्र समितीला चौकशीचे कागदपत्रच मागविण्यातच तीन महिने लोटले अजूनही काही कागदपत्रे येणे शिल्लक असल्याचे सांगितले जाते. चौकशी समितीने आतापर्यंत जमीन खरेदी व्यवहारातील कागदपत्रे मागविली आहेत. अजूनपर्यंत व्यक्तिश: चौकशीला सुरुवात झालेली नाही. चौकशी समिती पुणे आणि मुंबईत जाऊन आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कागदपत्रे सुद्धा तपासण्यात आली आहेत. तीन महिने प्रकरणांची कागदपत्रे तपासण्यातच गेली. प्रत्यक्ष सुनावणीला अजून बराच अवधी आहे. या पार्श्वभूमीवर समितीने मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे.(प्रतिनिधी)
झोटिंग समितीला हवी पुन्हा तीन महिने मुदतवाढ
By admin | Published: September 23, 2016 2:59 AM