नागपूर : शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त व्हावा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रशिक्षण व रोजगार सेल स्थापित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण व रोजगार सेल अंतर्गत गत सात महिन्यांमध्ये तब्बल ६०० विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना संधी तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यात प्रशिक्षण व रोजगार सेल यशस्वी होत आहे.
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण व रोजगार अधिकारी डॉ. भूषण महाजन यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण व रोजगार सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागांतर्गत १ ऑगस्ट २०२२ ते फेब्रुवारी २०२३ अखेर एकूण ५४ कंपन्यांनी त्यांचे रोजगार मिळावे विद्यापीठ अंतर्गत आयोजित केले. या विभागाअंतर्गत ६०० विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ५ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज प्राप्त झाले आहे. नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण व रोजगार सेल तसेच विद्यापीठाचे आभार मानले आहे.
विद्यापीठाच्या प्रशिक्षण व रोजगार सेलकडे आजपर्यंत एकूण ७, ४०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ३,६५८ या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विद्यापीठ शैक्षणिक परिसर आणि दीक्षांत सभागृह येथे आतापर्यंत २४ कंपन्यांकडून मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये ३१२ विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. नागपूर येथे जॉब फेअर अंतर्गत १४ कंपन्यांकडून मुलाखती घेण्यात आल्या त्यात ७२ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्या. वर्धा येथे आयोजित रोजगार मिळाव्यात १६ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यात २०० विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. या सर्व विद्यार्थ्यांना दीड लाखांपासून ५ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळाले आहे.