लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आणि मोहन मते मित्र परिवाराच्या परिश्रमातून साकारलेला ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ हा आगळावेगळा कार्यक्रम नागपुरातील तरुणाईचे स्फुल्लिंग चेतविणारा ठरला. अभिजित धर्माधिकारी, अंकित अरोरा आणि आशिष गोस्वामी या ध्येयवेड्या आणि झपाटलेल्या तरुणांनी माणसांना जोडा, तीच यशाची वाट ठरेल, असा संदेश येथील तरुणाईच्या मनावर कोरला.कविवर्य सुरेश भट सभागृहात शनिवारी सायंकाळी युवक, युवती आणि पालकांच्या भरगच्च उपस्थितीत या तीन युवकांनी आपल्या जगावेगळ्या जगण्यातील पाऊलवाटेवरचा प्रवास सांगितला. प्रारंभी शिक्षक आमदार नागो गाणार, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) नीलेश भरणे,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण संचालक शरद सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार गजानन निमदेव, समर्पण संस्थेचे विक्रम तेलगोटे, जीएमएस यवतमाळ महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार आणि माजी आमदार मोहन मते यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.प्रास्ताविक मोहन मते यांनी केले. ते म्हणाले, नागपुरातील तरुणांना भेटण्यासाठी आलेले हे तिन्ही युवक त्यांच्या ध्येय्यासाठी झपाटलेले आहेत. त्यांचे संस्कार युवकांमध्ये रुजावेत, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. लेखक आणि समुपदेशक मोहन गोविंदवार यांनी या तिन्ही युवकांना प्रगट मुलाखतीच्या माध्यमातून बोलते केले.समर्पण प्रतिष्ठान अकोला यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम तब्बल तीन तास रंगला. कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते पुढील महिन्यात होऊ घातलेल्या चित्रकला स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अभिजित मुळे यांनी केले तर राष्ट्रगीताने सांगता झाली.प्राण्यांच्या वेदना वाचल्या : आशिष गोस्वामीपर्यावरण संतुलनासाठी धडपडणारे आणि बेवारस प्राणी व वन्यजीवांच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेतलेले वर्धा येथील आशिष गोस्वामी यांनी ‘वेद वाचण्यापेक्षा प्राण्यांच्या वेदना वाचल्या’ असे सांगत आपल्या आयुष्याचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, सातव्या वर्गात असताना बाबा आमटे यांच्या श्रमसंस्कार छावणी शिबिरातून घडलो. ‘हाथ लगे निर्माण मे; नही मांगने, नही मारने’ हे मनावर बिंबले. मन बेवारस कुत्री, मांजरांच्या सेवेतच अधिक रमले. अशातच डॉ. विकास आमटे यांच्यामुळे मनेका गांधी यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी आयुष्याला दिशा दिली. प्रामाणिकपणे आणि श्रद्धा ठेवून केलेल्या कामात १०० टक्के यश मिळते. संवाद, सहनशीलता आणि नम्रतेची तयारी असेल तर लोकसंग्रह आपोआपच वाढतो, असा संदेश त्यांनी दिला.विश्वास ठेवून केलेले कार्यच यश देते : अंकित अरोरासायकलवरून सबंध भारतभ्रमणाला निघालेले आणि गेल्या ५५ दिवसापासून नागपुरात मुक्कामी असलेले राजस्थानातील अंकित अरोरा म्हणाले, माझी भ्रमंती नियोजित कधीच नसते. १५० दिवसाचा प्रवास ठरविला होता. मात्र आज ६९१ वा दिवस आहे, मी सायकलवरच आहे. आपण भविष्यातील प्रवासाचे नियोजन केलेले नाही. उत्स्फूर्तपणे, अनियोजितपणे मात्र मी जे करतो त्यावर विश्वास ठेवून फिरतो. निघताना सोबत ४० किलो सामान होते. आज फक्त दोन ड्रेस आणि लहानशी बॅग एवढेच ठेवले आहे. आयुष्यातील गरजा मर्यादित आहेत. जीवनाच्या प्रवासात माणसांना सोबत जोडले तर कशाचीही कमतरता पडत नाही, हे आपण शिकलो.अंगावर घेतल्याशिवाय भीती जात नसते : अभिजित धर्माधिकारीव्यक्तिमत्त्व विकासावर काम करणारे आणि मोटिव्हेशन स्पीकर म्हणून परिचित असलेले अभिजित धर्माधिकारी म्हणाले, पछाडण्याने दिशा गवसते. युवकांनी स्वत:ची आवड ठरवावी. त्यातून ध्येयाची निश्चिती करा. भीती घालविण्यासाठी जबाबदारी अंगावर घ्या, कामावर श्रद्धा ठेवा. आपण तिसरीतून शाळा सोडली. स्वत:वर अनेक प्रयोग केले. त्यातून घडलो. तंत्रज्ञानामुळे माणसांचा धीर हरवत चालला आहे. तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित करा. प्रतिक्रिया सारेच देतात, प्रतिसाद द्यायला शिका. स्वत:चा आत्मविश्वास वाढवा, आपल्या जगण्यावागण्यातून देशाचा अपमान होणार नाही, असे वागण्याचा सल्ला त्यांनी दिला.
माणसांना जोेडणे हीच यशाची वाट : झपाटलेल्या तिघांनी दिला संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:16 PM
माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आणि मोहन मते मित्र परिवाराच्या परिश्रमातून साकारलेला ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ हा आगळावेगळा कार्यक्रम नागपुरातील तरुणाईचे स्फुल्लिंग चेतविणारा ठरला. अभिजित धर्माधिकारी, अंकित अरोरा आणि आशिष गोस्वामी या ध्येयवेड्या आणि झपाटलेल्या तरुणांनी माणसांना जोडा, तीच यशाची वाट ठरेल, असा संदेश येथील तरुणाईच्या मनावर कोरला.
ठळक मुद्देप्रेरणादायी ठरल्या तरुणाईच्या वेगळ्या वाटा