लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्रकार हा समाजाचा आरसा असतो व समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्याने नेहमी चौकस असले पाहिजे. समाजाला सखोल समजून घेण्यासाठी त्याने नेहमी संशोधनात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आल्याबद्दल लोकमतचे उपमुख्य उपसंपादक योगेश पांडे यांचा विजय दर्डा यांच्या हस्ते लोकमत भवन येथे शुक्रवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. हे बदल स्वीकारत असताना पत्रकारांनी नवीन तंत्रज्ञानदेखील आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे. समाजातील विविध घटकांच्या अपेक्षा, माध्यमांमधील अभिसरणामुळे वाढलेली स्पर्धा यांचादेखील अभ्यास करणे गरजेचे आहे. यातूनच वृत्तपत्रांमधील बातम्या आणखी प्रभावी पद्धतीने मांडण्याची नवी दिशा मिळेल, असे विजय दर्डा म्हणाले. यावेळी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमत, लोकमत समाचार व लोकमत टाइम्सचे संपादक यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. योगेश पांडे यांनी आंतरशाखीय विद्याशाखेअंतर्गत जनसंवाद अभ्यासक्रमात 'पॉप्युलॅरीटी ऑफ मीडिया अमंग अंडरग्रॅज्युएट स्टुडन्टस इन नागपूर डिस्ट्रिक्ट' या विषयावर संशोधन केले. त्यांनी नेटदेखील उत्तीर्ण केली असून अशी कामगिरी करणारे ते नागपूरप्रमाणे लोकमत वृत्तपत्र समूहातील एकमेव पत्रकार आहेत.