लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदलत्या काळात पत्रकारितेतील कार्यप्रणाली तसेच पत्रकारांवरील जबाबदाऱ्यादेखील बदलत आहे. स्पर्धेच्या या युगात पत्रकारांसमोर ‘डिजिटलायझेशन’ तसेच ‘एआय’चे (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स) आव्हान आहे. याला सामोरे जात असताना पत्रकारांनी एकापेक्षा जास्त कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.जनसंवाद विभागाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, विभागप्रमुख डॉ.मोईज हक प्रामुख्याने उपस्थित होते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्या दैनिकांचे वितरण मर्यादित होते; आजसारखी त्यांची व्याप्ती नव्हती. तरीही त्यांचा प्रभाव आजच्या माध्यमांपेक्षा अधिक होत असे.लोकमान्य टिळकांना वर्तमात्रपत्रांतील लिखाणामुळे मंडालेच्या तुरुंगात पाठविण्यात आले. त्यांच्याविरोधात मुंबईच्या अशिक्षित गिरणी कामगारांनी मोठे आंदोलन केले होते. ते टिळकांच्या वृत्तपत्राचे वाचक नव्हते, पण त्यांना हे माहीत होते की, हा माणूस आपल्या भल्यासाठी लिहितो. पत्रकारांचे स्वातंत्र्य टिकून रहावे यासाठी अशिक्षित कामगारांनी जीवाचे बलिदान केले होते. मागील ३० वर्षांमध्ये माध्यमांना कॉर्पोरेट स्वरूप आले आहे. माध्यमे हा उद्योग असला तरी पत्रकारिता हा काही उद्योग नाही. तो नफ्यासाठी केला जात असेल, पण पत्रकारिता ही आदर्शांनुसार चालते, असे प्रतिपादन पी.साईनाथ यांनी केले.प्रसारमाध्यमांचे सामर्थ्य कायम असून काळानुरुप पत्रकारांना स्वत:ला बदलले पाहिजे. अभ्यासक्रमांमध्येदेखील बदल असतील तर विद्यापीठ त्यासाठी नेहमीच पुढाकार घेईल, असे डॉ.विनायक देशपांडे यांनी सांगितले.डॉ.मोईज हक यांनी संचालन करत असताना विभागाच्या वाटचालीवर तसेच विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. प्रा. स्निग्धा खटावकर यांनी संचालन केले तर अमर अणे यांनी आभार मानले.
पत्रकारितेची बदलती व्याप्ती समजून घ्या : पुप्पाला४‘जनसंवाद क्षेत्रातील करिअरच्या नव्या संधी’ या विषयावरील परिसंवादात स्वतंत्र पत्रकार व माध्यम सल्लागार चंद्रमोहन पुप्पाला, वरिष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर, ‘सार डिजिटल‘चे प्रमुख अनुराग कुळकर्णी, जी.व्ही.के. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कॉर्पोरेशनचे ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ व्यवस्थापक भालचंद्र चोरघडे, ‘आर.जे.’ मिलिंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पत्रकारितेची व्याप्ती बदलते आहे व त्याचा विस्तार होतो आहे. केवळ टीव्ही, वर्तमानपत्र यातूनच पत्रकारिता होते असे नाही. तर नवमाध्यमांतदेखील विविध ‘प्लॅटफॉर्म्स’ उपलब्ध आहेत. मूळ प्रवाहातील माध्यमांसह नवमाध्यमांना उत्कृष्ट मजकूर आवश्यक आहे. त्यामुळे स्वतंत्र पत्रकारिता करत या संस्थांना दर्जेदार मजकूर पुरविला जाऊ शकतो, अशी माहिती चंद्रमोहन पुप्पाला यांनी दिली. खासगी रेडियो क्षेत्रात नव्या टॅलेंटची आवश्यकता आहे. परंतु कौशल्य असलेले मनुष्यबळ मिळत नसल्याची खंत मिलिंद पाटील यांनी व्यक्त केली.