लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुलगुरूपद स्वीकारले तेव्हा पत्रकारांची काहिशी भीती वाटायची. मात्र आता त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक वाटते. पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, माजी विभागप्रमुख प्रा.शरद पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, विभागप्रमुख डॉ. मोईज हक प्रामुख्याने उपस्थित होते. जर पत्रकारांनी विवेकशून्य विचारातून काही मांडले तर त्यात सखोलता राहत नाही. पत्रकारांसमोर तंत्रज्ञानाचेदेखील आव्हान आहे, असे डॉ.काणे म्हणाले. सामाजिक विकासात प्रसारमाध्यमांची मौलिक भूमिका असते. लिखाण हे पत्रकारांचे सर्वात मोठे शस्त्र आहे. पत्रकारिता करत असताना नीतीमत्ता ढासळू न देण्यावर भर दिला पाहिजे. नीतीमूल्यांवर आधारित पत्रकारिता व माध्यम स्वातंत्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जनसंवाद विभागाच्या पुढील विकासासाठी विद्यापीठाकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे डॉ.देशपांडे यांनी सांगितले. पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. तंत्रज्ञानासोबत आपली गती कायम राखण्याचे आव्हान या क्षेत्रासमोर आहे. या क्षेत्रात येण्यास इच्छुक असलेल्यांनी सजगतेचा गुण अंगी बाळगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा.शरद पाटील यांनी केले.प्रास्ताविकादरम्यान डॉ.मोईज हक यांनी विभागाच्या प्रवासाबाबत भाष्य केले. तसेच फेब्रुवारी महिन्यात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या प्रसंगी माजी विभागप्रमुख प्रा. के.जी. मिसार, प्रा. चंद्रशेखर गुप्ता, डॉ. विनोद इंदूरकर आणि प्रा. शरद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांद्वारे संपादित वार्षिकांक ‘कॅम्पस’चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अमर अणे यांनी संचालन केले तर प्रा.स्निग्धा खटावकर यांनी आभार मानले.
पत्रकारांनी विवेकबुद्धी राखून काम करावे : सिद्धार्थविनायक काणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:04 PM
पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देजनसंवाद विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे उद्घाटन