आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनच्या ताब्यातून तिबेटला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरातील एका तरुण भंतेजींनी पुढाकार घेत तिबेटमुक्ती धम्म पदयात्रा सुरू केली आहे. दीक्षाभूमी ते धर्मशाळा असा दोन हजार किमीचा प्रवास ते पायी चालून पूर्ण करणार आहेत. या प्रवासात ते विविध बौद्ध स्थळांना भेटी देत ठिकठिकाणी तिबेटच्या मुक्तीसाठी जनजागृतीही करणार आहेत. तसेच तिबेटचे स्वातंत्र्य हे भारतासाठी कसे महत्त्वाचे आहे, हेही पटवून देणार आहेत.भंते रेवत दीक्षाभूमी असे या तरुण भंतेजींचे नाव. चंद्रपूर येथील दीक्षाभूमी येथून त्यांनी आपल्या धम्म पदयात्रेला सुरुवात केली आहे. सध्या ते नागपुरात दाखल झाले आहेत. येथील दीक्षाभूमीला भेट दिली असून, भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची भेट घेऊन ते पुढील प्रवासाला निघणार आहेत. यादरम्यान त्यांच्याशी संवाद साधता आला. तिबेट हा एक स्वतंत्र देश आहे. परंतु तो सध्या चीनच्या ताब्यात आहे. तिबेट हे पूर्णपणे बौद्ध राष्ट्र आहे. ६० वर्षांपूर्वी चीनने तिबेटवर अतिक्रमण करून ते राष्ट्र आपल्या ताब्यात घेतले. तिबेटी लोक दलाई लामा यांच्या नेतृत्वात आजही आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत. भारतासह जगभरात तिबेटी लोक निर्वासितांचे जीवन जगत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही तिबेटच्या स्वातंत्र्याचे समर्थन करीत भारताने तिबेटला स्वतंत्र राष्ट्राची मान्यता दिली असती तर आज चीनसोबतचा सीमेचा वाद राहिलाच नसल्याचे तेव्हाच स्पष्ट केले होते. तिबेट हे एक बौद्ध राष्ट्र आहे. तथागत गौतम बुद्धांना ते मानतात. त्यामुळे भारताबद्दल त्यांच्या मनात एक नितांत आदर आहे. तसेच भारतानेही पारतंत्र्य भोगले आहे. त्यामुळे स्वतंत्र राष्ट्र याचे महत्त्व एक भारतीय या नात्याने आपल्यालाही आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता तिबेट स्वतंत्र व्हावे, अशी आपली इच्छा असल्याचे भंते रेवत यांचे म्हणणे आहे. दीक्षाभूमीवरून धर्मशाळापर्यंत ते पायी चालत जात आहेत.यादरम्यान ते विविध ठिकाणी चर्चासत्र, व्याख्यान आदींद्वारे तिबेटची मुक्ती भारतासाठी कशी आवश्यक आहे, हे पटवून देत असून जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या लढ्यात त्यांना समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, इंडो तिबेट संघटना, पंचशील बुद्धगया मुक्ती आंदोलन, अखिल भरतीय भिक्खू संघ, महाबोधी सोसायटी आॅफ इंडिया आणि अखिल भारतीय धम्मसेना यांच्यासह देशातील विविध संघटनांचे सहकार्य मिळत आहे.स्वतंत्र तिबेट हे भारताच्या हिताचेचीनचे सामर्थ्य व त्याचे साम्राज्यवादी धोरण लक्षात घेता, आज आपल्याला पाकिस्तानपेक्षा चीनचा अधिक धोका आहे. सीमारेषेवरून नेहमीच वाद होत असतात. दोन्ही देशांचे संबंध बिघडत असतात. अशा परिस्थितीत तिबेट हे स्वतंत्र राष्ट्र असणे हे भारताच्या हिताचे आहे. तिबेट हे स्वतंत्र झाले तर चीनसोबतचा सीमावाद हा कायमचा संपेल. तिबेटसारखे एक शांत शेजारी राष्ट्र भारताला लाभल्याने त्या सीमेवरील तणाव कायमचा संपुष्टात येईल. त्यामुळे ह विषय केवळ तिबेटच्या स्वातंत्र्यापुरता मर्यादित नसून तो भारताच्या कायमस्वरूपी संरक्षणाच्या हिताचाही आहे. याबाबतची आपण जनजागृती करीत आहोत.भंते रेवत दीक्षाभूमी