रामटेक : रामटेक तालुक्यात सध्या रस्त्याची चाळण झाली आहे. ग्रामीण भागात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने स्थानिकासह विशेषत: गर्भवती महिलांना याचा अधिक त्रास होतो आहे. तालुक्यात डोंगरी येथे प्राथमिक आराेग्य उपकेंद्र येथे आहे. तिथे परिसरातील गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी जातात. शासनाने जाहीर केलेल्या अनेक याेजनांचा लाभ घेण्यासाठी उपकेंद्र डाेंगरी येथे जावे लागते. या केंद्रापासून २ कि.मी. अंतरावर मुकनापूर गाव आहे. या रस्त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. डांबरी रस्त्याच्या मातीच्या रस्त्यात रूपांतरण झाले आहे. या रस्त्यावर वाहन चालविणे कठीण झाले आहे. गराेदर महिलांना वेळेवर पाेहोचायला उशीर हाेत आहे. त्यामुळे त्यांच्या आराेग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या उपकेंद्रावर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणसुद्धा सुरू आहे. नागरिकांना मात्र तिथे जायला अडचण हाेत आहे. तालुक्यात सध्या रस्त्याची समस्या माेठ्या प्रमाणात आहे. रस्ते तयार झाले, पण कंत्राटदारांनी काम निकृष्ट दर्जाचे केले. पण आता डागडुजीसाठी निधी नसल्याने सर्वांनी हात वर केले आहेत.
डोंगरी-मुकनापूरचा प्रवास झाला खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:13 AM