लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दोन महिन्यांपासून बदलीची आस लावून बसलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अखेर राज्य सरकारने आज दिलासा दिला. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच सहपोलीस आयुक्तांसह नऊ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांची पुण्याला सहपोलीस आयुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी पुण्याहून रवींद्र कदम येथे येणार आहेत. कदम यांनी यापूर्वी नागपुरात विविध पदावर काम केले असून, त्यांना नागपूर शहर आणि येथील गुन्हेगारी नेटवर्कची चांगली माहिती आहे.परिमंडळ एकचे उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची बदली परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे. परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश ओला यांना नागपूर ग्रामीणचे अधीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. परिमंडळ पाचचे उपायुक्त सुहास बावचे तसेच विशेष शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांची बदली पुण्याला झाली आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त एस. चैतन्य यांना जालना पोलीस अधीक्षक म्हणून नेमण्यात आले असून, परिमंडळ दोन, वाहतूक शाखा तसेच आता पोलीस मुख्यालयाची जबाबदारी सांभाळणारे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांना दहशतवाद विरोधी पथकाचे उपायुक्त म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवित पुण्याला बदली देण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक अनंत रोकडे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी ठाणे येथून डॉ. संदीप भाजीभाकरे यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई येथून विवेक मासाळ, पालघर येथून राजतिलक रोशन आणि अमरावती येथून पंडित चिन्मय सुरेश यांची नागपुरात उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. ग्रामीणचे अधीक्षक शैलेश बलकवडे यांना गडचिरोलीचे अधीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.