बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडावरील निर्णय राखीव
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 12, 2023 04:44 PM2023-05-12T16:44:50+5:302023-05-12T16:45:13+5:30
Nagpur News सरकार व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. गावंडे यांनी शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यावरील निर्णय राखीव ठेवला आहे.
राकेश घानोडे
नागपूर : सरकार व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. गावंडे यांनी शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यावरील निर्णय राखीव ठेवला आहे. निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
गणेश शिवभरण शाहू हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. इतर आरोपींमध्ये गणेशची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी, भाऊ अंकित व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ते सर्व पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. या न्यायालयात अल्पवयीन मुलगा वगळता इतर तीन आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३९४, ३६४, २०१, १२०-ब, ३४ व ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३ (२) (५) हे दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. उषा कांबळे व राशी कांबळे, अशी मृतांची नावे होती. सरकारच्या वतीने विशेष वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांनी आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी ३५ साक्षीदार तपासले. तसेच, वैद्यकीय अहवालासह इतर विविध ठोस पुराव्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. फिर्यादी रविकांत कांबळे यांचे वकील ॲड. समीर सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले. आरोपींच्या वतीने ॲड. आर. एम. भागवत व ॲड. अनिरुद्ध चांदेकर यांनी युक्तिवाद केला.
फेब्रुवारी २०१८ मधील घटना
ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली. त्या दिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांच्यामध्ये भिशीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला आणि त्यांचे मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावाजवळच्या नाल्यात फेकून दिले, अशी तक्रार आहे.