नागपूर : वर्धा रोडवरील जामठ्याजवळ खवल्या मांजराची विक्री करणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज सोमवारी न्यायालयाने फेटाळला. यातील चारही आरोपींना जामीन देण्यास साफ नकार दर्शवीत न्यायालयीन कोठडी सुनावली आणि मध्यवर्ती कारागृहात रवाना केले.
गेल्या बुधवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने सापळा रचून या घटनेतील आरोपींना अटक केली होती. गुरुवारी न्यायालयापुढे हजर केल्यावर पाच दिवसांची वनकोठडी सुनावली होती. सोमवारी एफसीआरची मुदत संपल्याने वन विभागाच्या पथकाने दुपारी त्यांना न्यायालयासमोर उभे केले.
बालाघाट येथील काही तस्करांकडून कोरोना काळामध्ये खवल्या मांजराची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोला (डब्लूसीसीबी) मिळाली होती. यावरून डब्लूसीसीबीच्या पथकाने संबंधित आपल्या पंटरमार्फत तस्करांसोबत संपर्क साधला होता. खवल्या मांजरांच्या खरेदीचा व्यवहार पक्का झाल्यावर बुधवारी सकाळी ५ वाजता वर्धा रोडवर हे आरोपी एमएच/४९/एटी/९५५६ क्रमांकाच्या कंटेनरने हे प्राणी देण्यासाठी पोहचले होते. यादरम्यान रचलेल्या सापळ्यानुसार त्यांना अटक करण्यात आली होती, तर चौथ्या आरोपीला बालाघाटमधील एका गावातून अटक करण्यात आली होती.
...
आरोपींचे मोबाईल जप्त
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वापरलेले मोबाईल तपास पथकाने जप्त केले आहेत. त्यांची सीडीआर काढून या आरोपींसंदर्भात अधिक माहिती मिळविली जाणार आहे.
...