डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह : रसिकांची भरगच्च गर्दी नागपूर : विदर्भातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अष्टपैलू गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २३ व्या स्मृती संगीत समारोहाचे उदघाटन देशपांडे सभागृहात झाले. शास्त्रीय संगीतातील कर्नाटक व हिंदुस्तानी शैलीतील विख्यात कलाकार पंडित रोणू मुजूमदार व कर्नाटक तसेच उत्तर हिंदुस्तानी संगीत पारंगत प्रतिभावंत गायिका जयश्री यांच्या मधाळ गायन-वादनाची जुगलबंदी व ख्यातनाम गायक बंधुद्वय पंडित राजन-साजन मिश्रा यांचे सुमधूर गायन असे या शुभारंभी दिवसाचे नितांत श्रवणीय सादरीकरण होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती प्रसन्न वैराळे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, डब्ल्यूसीएलचे प्रबंध संचालक ओमप्रकाश व द.म. सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते समारोहाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर आभाळस्पर्शी प्रतिभेचे दोन कलाकार पं. रोणू मुजूमदार व गायिका जयश्री यांची बासरी व गायनाची अनोखी जुगलबंदी ही उपस्थितांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. आपापल्या क्षेत्रातील उत्तुंग प्रतिभेचे धनी असलेल्या या कलाकारांनी आपल्या जुगलबंदीचा आरंभ कर्नाटक संगीतातील अतिशय प्रचलित अशा राग झिंझोटीसह केला. पं. त्यागराजन रचित रचनेचे हे सुरेल सादरीकरण होते. पं. मुजूमदार यांच्या मधाळ गायकी अंगाचे सुरेल वादन, श्वासावर कमालीचे नियंत्रण, आरंभिक आलाप यातील प्रासादिकता व गाजदार स्वरांसह रचनेतील स्वर-शब्दांचे वेधक सादरीकरण करणाऱ्या गायिका जयश्री यांची परस्पर सामंजस्यासह ही जुगलबंदी रंगतदारपणे सादर केली. राग जयजयवंतीतील रचनेतील स्वरांचे बेहलावे, सरगमचे मोहक झुले, तर सह मृदंगम वादक सुयश नारायण व तबला वादक रामदास पळसुले यांच्या खुमासदार सहवादन जुगलबंदी व समापनाचे कानडी भजन ‘कृष्णा बेगमी बारो’ ची प्रसन्न अनुभूती असे सादरीकरण श्रोत्यांसाठी श्रवणाची पर्वणीच ठरले. यानंतर बनारस घराण्याचे विख्यात बंधुद्वय गायक पंडित राजन - साजन मिश्रा यांचे गायन समारोहाची अनोखी शान होते. गायनात पूरब अंगाची रसिली मिठास, तर उस्ताद आमिर खाँ साहेब यांच्या गायनातील स्वरलीनता तर, पंडित भीमसेन जोशींच्या सादरीकरणातील गाजदारपणा अशा संमिश्र वैशिष्ट्यांसह आपले गायन स्वरकणांनी खुलविणाऱ्या या गायकांनी बंदिशीने गायनाला सुरुवात केली. त्यांनी आपल्या गायनाने श्रोत्यांना तृप्त केले. या कार्यक्रमात तबल्यावर राजू गुजर, हार्मोनियम संदीप गुरमुळे, तानपुरा विनोद वखरे व अजित कुळकर्णी या वाद्य कलावंतांनी अनुरुप साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले. यावेळी युवा गायन-वादन स्पर्धेतील विजेते कलाकार हिंदुस्तानी गायन उपविजेते मानस विश्वरुप, कर्नाटक मृदंगम वादक अनंत पद्मनाभन, हिंदुस्तानी गायनाचा प्रथम पुरस्कार आदित्य मोडक , हिंदुस्तानी शास्त्रीय तबला वादक मयुर शर्मा, कर्नाटक गायनाचा प्रथम पुरस्कार विघ्नेश ईश्वर यांना उपस्थित अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रथम पुरस्कार ५१ हजार तर द्वितीय पुरस्कार ३१ हजार रुपयांचा होता. विजेत्यांना पुढील वर्षीच्या महोत्सवात गायन, वादनाची संधी देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
जुगलबंदी अन् वादनात रंगले रसिक!
By admin | Published: July 31, 2014 1:06 AM