लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे नागपुरात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. सरकारी किंवा खासगी कोणत्याच हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने कुणी घरी, कुणी रस्त्यावर, तर कुणी ॲम्ब्युलन्समध्ये जीव सोडत आहेत. अशा अवस्थेत नवीन जम्बो कोविड हॉस्पिटलची तातडीने निर्मिती करण्याविषयीची गरज नेतेमंडळी अथवा प्रशासकीय यंत्रणेला का वाटत नाही, असा संतप्त सवाल रडकुंडीला आलेल्या नागरिकांकडून विचारला जात आहे.
नागपुरात तातडीने जम्बो कोविड हॉस्पिटल निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या विषयाने रोज सर्वसामान्यांकडून मागणीवजा ओरड केली जात आहे. तर, नेतेमंडळी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते.
नव्या जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी जागा अथवा इमारत तातडीने कशी उपलब्ध होईल, असा खोडा घालणारा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचीही प्रशासकीय यंत्रणेत चर्चा आहे. दुसरीकडे उपलब्ध असलेल्या सर्व सुविधायुक्त इमारतींकडे नेतेमंडळी आणि प्रशासकीय अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा संतापजनक नमुना सालई गोधनीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारतीच्या उपलब्धतेतून पुढे आला आहे.
नागपूर शहराच्या दक्षिण दिशेला कालडोंगरी-सालई गोधनी गट ग्रामपंचायत आहे. येथे २०१७ मध्ये सुमारे पाच एकरांच्या प्रशस्त परिसरात सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. आरोग्य केंद्रच नव्हे तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची वसाहतही येथे निर्माण करण्यात आली. सुमारे १० कोटी रुपये खर्च करून हे बांधकाम २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आले. मात्र, आता चार वर्षे होऊनही येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले नाही. ही रंगपेंट देऊन कुलूपबंद केलेली इमारत धूळखात पडून आहे. देखभाल होत नसल्यामुळे पाऊस आणि वादळाच्या तडाख्याने येथील पाण्याची टाकी खराब झाली असून काही खिडक्यांची तावदाने तर काही दारेही तुटली आहेत.
---
संतापजनक दुर्लक्ष
शहरात कोणत्याही सरकारी अथवा खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची तीव्र कुचंबणा सुरू आहे. उपचाराची सोय नसल्याने अनेक रुग्ण त्यांच्यात्यांच्या घरात, रस्त्यावर, ॲम्ब्युलन्समध्ये आणि दवाखान्यांसमोर तडफडून जीव सोडत आहेत. अत्यंत विदारक अशी परिस्थिती असताना प्रशासन तसेच नेतेमंडळी जम्बो कोविड हॉस्पिटल निर्मिती, बेड, ऑक्सिजन सिलिंडर आणि अन्य औषधोपचारावर नुसती चर्चा करीत आहेत. या चर्चेत नव्या हॉस्पिटलच्या जागेचा (इमारतीचा) प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, तयार असलेल्या सालई गोधनीच्या इमारतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
---
फक्त वीज, पाणी जोडण्याची गरज
नेते आणि प्रशासनाने मनावर घेतल्यास सालई गोधनीच्या या आरोग्य केंद्राला वीज, पाणी जोडून आणि बेडची व्यवस्था करून अवघ्या २४ तासांत एक प्रशस्त कोविड हॉस्पिटल सुरू केले जाऊ शकते. प्रशासकीय अधिकारी आणि नेतेमंडळींनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
---
आणखी काही बळींची वाट बघत आहे का ?
उपाययोजनांच्या नावाखाली काथ्याकूट करणारी
ही मंडळी खरेच त्यासाठी पुढाकार घेते की, केवळ कपाळावर आठ्या आणून चर्चेच्या नावाखाली आणखी काही बळी जाण्याची वाट बघते, त्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---
...तर आंदोलन करू : गावकऱ्यांचा इशारा
तातडीने येथे उपचाराची सोय उपलब्ध केली नाही, तर सालई गोधनी तसेच कालडोंगरी गावातील नागरिक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा या भागातील सामाजिक कार्यकर्ते विनोद मिसाळ यांनी दिला आहे. हे आंदोलन झाल्यास नागपूरकर नागरिकही त्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होतील. त्यानंतर नेतेमंडळी आणि प्रशासनाची नाचक्की होऊ शकते.
---