नागपुरात तातडीने जम्बो हॉस्पिटल उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 07:51 PM2020-09-09T19:51:37+5:302020-09-09T19:53:22+5:30
मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही एक जम्बो रुग्णालय तातडीने उभारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. शासकीय व खासगी रुग्णालये मिळून फक्त ३,०७८ खाटा उपलब्ध आहेत, आणि रुग्णांची संख्या ११,४७७ वर पोहोचली आहे. मनपाची ५ रुग्णालये असून ४५० खाटा आहेत. परंतु डॉक्टर, परिचारिका व इतर मनुष्यबळ नसल्याने येथे रुग्णांची भरती केली जात नाही. एकेका रुग्णाला खाटांसाठी भटकंती करावी लागत आहे, राज्याच्या उपराजधानीची ही अवस्था असून मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही एक जम्बो रुग्णालय तातडीने उभारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ नियोजन मंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना नागपुरातील कोरोनाच्या परिस्थितीशी अवगत केले. तसेच अवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. महात्मा फुले जीवनदायी योजनेतून सर्वसामान्य गरीब कुटुंबीयांना तातडीने आरोग्याची सोय उपलब्ध करून द्यावी, तसेच ज्या रुग्णांनी आरोग्य विमा काढला आहे, तो विमा अनेक खासगी रुग्णालये अमान्य करून रुग्णांना पूर्ण पैसे भरायला लावत असल्याच्या अनेक तक्रारी येताहेत, याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.